(Image Credit : www.thedrinksbusiness.com)
जगभरात झालेल्या एकापेक्षा एक मोठ्या चोऱ्या आणि दरोड्यांबाबत तुम्ही ऐकलं असेल. ज्यात पैसे आणि किंमती दागिन्यांची लूट केली गेली असेल. पण कधी कोट्यवधी रूपयांचं पाणी चोरीला केल्याचं ऐकलं का? नक्कीच ऐकलं नसेल. पण अशी चोरी नुकतीच झाली.
अनोखी चोरी
कॅनडातील न्यूफाउंडलॅंडमध्ये एक विचित्र चोरी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी चोरांनी एका व्होडका कंपनीचं ३० हजार लीटर पाणी चोरी केलं. तुम्ही म्हणाल यात काय अनोखं आहे? तर चोरी झालेलं पाणी हे सामान्य नव्हतं, तर आइसबर्गचं होतं. हे पाणी फार शुद्ध असतं, ज्याचा वापर महागडा वोडका(दारू) आणि कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स तयार करण्यासाठी केला जातो. आइसबर्ग वोडका कंपनीनुसार, चोरी करण्यात आलेलं पाणी हे ८.५ लाख रूपये किंमतीचं होतं.
कंपनीतील लोक चोर असल्याचा संशय
पोलीस सध्या या चोरांचा शोध घेत आहेत. त्यांना संशय आहे की, हे एका व्यक्तींच काम नाही. टोळीने हे काम केलं असेल आणि चोरांनी ही चोरी एका दिवशी नाही तर हळूहळू केली. पोलिसांना असाही संशय आहे की, चोरांना पाण्याचे कंटेनर्स आणि त्याचं महत्त्व माहीत होतं. त्यामुळे ही चोरी कंपनीतीलच काही लोकांनी केल्याचा संशय त्यांना आहे.
कंपनीचे सीईओ डेविड मायर्स यांनी सांगितले की, 'या चोरीत सगळे नसतीलही पण निदान एक तरी व्यक्ती सहभागी असावा. कारण पूर्ण टॅंक त्याच्या मदतीशिवाय रिकामा केला जाऊ शकत नाही. याचं कारण कंटेनरच्या लॉक्सचे पासवर्ड बाहेरच्या लोकांना माहीत होऊ शकत नाहीत.
इतकी सुरक्षा असूनही
कंपनीशी निगडीत लोकांनी पोलिसांना सांगितले की, चोरी खरंच हैराण करणारी आहे. कारण टॅंकर्स फार सुरक्षेत ठेवले जातात. आणि सतत त्यांच्या आजूबाजूला सुरक्षारक्षक राहतात. ही घटना स्टाफ सुट्टीवर असण्यादरम्यान झाली असावी. सुट्टीनंतर स्टाफ परत आला तेव्हा टॅंकरमध्ये पाण्याचा एक थेंबही नव्हता.
कसं मिळतं आइसबर्गपासून पाणी
कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, आइसबर्गपासून पाणी काढण्याची प्रक्रिया फार कठीण असते. आधी तर सरकारकडून याची परवानगी घ्यावी लागते. नंतर काही जाळी, हायड्रॉलिक मशीन्स, रायफल आणि कापण्यासाठी मशीन्स घेऊन आइसबर्गला तोडलं जातं. तुकड्यांना स्पीड बोटच्या मदतीने किनाऱ्यावर नेलं जातं. शेवटी वाफेने हे तुकडे स्वच्छ करून वापरण्यालायक केले जातात.