बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:58 IST2025-11-11T19:57:10+5:302025-11-11T19:58:46+5:30
एका कर्मचाऱ्याने पायाच्या दुखण्यामुळे अधिकृत वैद्यकीय सुट्टी घेतली. परंतु, कंपनीने कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाचा आरोप ठेवून त्याची नोकरी संपुष्टात आणली.

बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
चीनमधून एक असा अविश्वसनीय प्रकार समोर आला आहे, ज्याने सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे. एका कर्मचाऱ्याने पायाच्या दुखण्यामुळे अधिकृत वैद्यकीय सुट्टी घेतली. परंतु, त्याच्या मोबाईलमधील फिटनेस ॲपमध्ये नोंदवलेल्या १६,००० पावलांच्या नोंदीमुळे त्याला थेट नोकरी गमवावी लागली. खासगी आयुष्यात तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप किती वाढला आहे, यावर या घटनेने मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
ही घटना चीनच्या जिआंगसू प्रांतातील एका खासगी कंपनीत घडली. चेन नावाचा कर्मचारी २०१९ पासून या कंपनीत कार्यरत होता. कामादरम्यान पाठीला दुखापत झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने यापूर्वी वैद्यकीय रजा घेतली होती. पुन्हा एकदा दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर चेन कामावर परतला, पण काही तासांतच त्याने पुन्हा सुट्टीची मागणी केली.
यावेळी त्याला 'हील स्पर' नावाचा त्रास झाला होता, ज्यामुळे त्याला चालताना तीव्र वेदना होत होत्या. डॉक्टरांनी त्याला सात दिवसांची पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले. मात्र, कंपनी व्यवस्थापनाला यावेळी चेनवर विश्वास बसला नाही. "जर पायाला इतका त्रास होत असेल, तर तो एका दिवसात १६,००० पाऊले कसा चालला?" असा प्रश्न कंपनीने उपस्थित केला.
कंपनीने तात्काळ चौकशी सुरू केली. चेनच्या मोबाईल ॲपमधून पावलांचा रेकॉर्ड काढण्यात आला. तसेच, सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले, ज्यात चेन कार्यालयाकडे धावताना दिसला होता. या 'डिजिटल पुराव्यांच्या' आधारावर कंपनीने चेनवर शिस्तभंगाचा आरोप ठेवून त्याची नोकरी संपुष्टात आणली.
कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
नोकरी गमावल्यानंतर चेनने कंपनीच्या या निर्णयाला आव्हान दिले. त्याने न्यायालयात बाजू मांडली की, मोबाईल ॲपमधील पावलांचा डेटा पूर्णपणे अचूक नसतो आणि तो पुरावा मानला जाऊ शकत नाही. त्याने सर्व वैद्यकीय अहवाल आणि डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर केले, जे त्याची खरी शारीरिक स्थिती सिद्ध करत होते. हे प्रकरण कामगार लवादाकडे गेले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर लवादाने चेनच्या बाजूने निकाल दिला. कोर्टाने स्पष्ट केले की, मोबाईल ॲपचा डेटा अनेकदा चुकीचा नोंदवला जातो, विशेषत: जेव्हा फोन दुसऱ्या व्यक्तीकडे असेल किंवा तो सतत हलत असेल. त्यामुळे, फक्त डिजिटल ॲप डेटा किंवा मोबाईल रेकॉर्डच्या आधारावर कर्मचाऱ्याच्या आजारपणावर किंवा सचोटीवर शंका घेणे अयोग्य आहे.
अखेरीस, कोर्टाने कंपनीला आदेश दिला की, त्यांनी चेनला नोकरीवरून काढल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करावी आणि त्याला १.१८ लाख युआन (१४.८ लाख रुपये) एवढी भरपाई द्यावी. कंपनीने वरच्या कोर्टात अपील केले, पण तिथेही चेनच्या बाजूनेच निर्णय गेला. न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, कर्मचाऱ्याची खासगी मोबाईल माहिती त्याच्या परवानगीशिवाय तपासणे, हे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे.