‘स्पेस-आऊट कॉम्पिटिशन’! ‘टाइमपास’ करा, शांत बसा, बक्षीस जिंका; या देशात भन्नाट स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 07:59 IST2025-07-08T07:59:09+5:302025-07-08T07:59:51+5:30
दक्षिण कोरियामध्ये २०२४ पासून अशा प्रकारची स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. दक्षिण कोरियात लोक खूप काम करतात

‘स्पेस-आऊट कॉम्पिटिशन’! ‘टाइमपास’ करा, शांत बसा, बक्षीस जिंका; या देशात भन्नाट स्पर्धा
दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथील एका विस्तीर्ण मैदानावर शेकडो लोक जमलेले होते. सगळे जण निवांत बसलेले होते. कोणाच्याच चेहऱ्यावर कुठलाच तणाव नव्हता की कोणाला कसली घाई आहे असं दिसत नव्हतं. सगळे जण एकदम रिलॅक्स दिसत होते. किंबहुना त्यासाठीच सारे जण इथे जमले होते.
प्रत्येक जण एका ओल्या मॅटवर बसला होता. कारण नुकताच पाऊस पडून गेला होता. काही जण त्या मॅटवर लोळलेले होते. काही जण आकाशाकडे पाहात होते. काही जण सुखासनात बसले होते. काहींनी डॉक्टरांचा पोशाख घातला होता, काहींनी डेन्टिस्टचा, काही जण आपल्या ऑफिसच्या पोशाखात होते, काही जण कामगारांच्या, तर काही जण विद्यार्थ्यांच्या..
खरं तर दक्षिण कोरिया हा ‘कामसू’ लोकांचा देश म्हणून परिचित आहे. प्रत्येक जण काहीना काही कामात असतो. त्यांना टाइमपास करायला आवडत नाही. मग असं असूनही आकाशाच्या उघड्या छताखाली इतके सारे लोक काहीही काम न करता, असे ‘टाइमपास’ करत कशासाठी बसले होते? - खरं तर ही होती एक अत्यंत अनोखी स्पर्धा. या स्पर्धेचं नाव ‘स्पेस-आऊट कॉम्पिटिशन’! म्हणजे कामधाम सोडून ‘आराम’ करण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठीची स्पर्धा! स्पर्धेसाठी जमलेल्या ज्या व्यक्तीचा हार्ट रेट जास्तीत जास्त स्टेबल असेल, म्हणजे ज्याच्या हृदयाची गती सर्वाधिक स्थिर असेल, तो विजेता ठरणार होता. त्यासाठी भलंमोठं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
केवळ दक्षिण कोरियातीलच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांतील ‘स्पर्धक’ या आगळ्यावेगळ्या स्पर्धेसाठी येथे हजर होते. पण स्पर्धेपेक्षाही लोकांनी रोजच्या ताणतणावापासून, कामाच्या धबडग्यातून मुक्त व्हावं, रोजची धावपळ-चिंता बाजूला ठेवावी, काहीही न करता नुसतं बसून राहाणं म्हणजे टाइमपास किंवा वेळ वाया घालवणं नाही, तर तो तुमच्या आयुष्याचा एक अतिशय महत्त्वाचा, अविभाज्य घटक आहे, हे लोकांनी लक्षात घ्यावं आणि अधूनमधून ‘काहीही काम न करता नुसतं बसून राहावं’, रिलॅक्स करावं, रिलॅक्स होणं शिकावं यासाठीच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती! स्पर्धेचे नियमही अतिशय साधे-सोपे होते. मुख्य अट केवळ एकच.. काहीही न करता नुसतं बसून राहा, आराम करा. रिलॅक्स व्हा; पण हे करत असताना झोपायचं मात्र नाही! रिलॅक्स करताना तुम्ही झोपूनच गेलात, तर मग मात्र तुम्हाला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात येईल!
दक्षिण कोरियामध्ये २०२४ पासून अशा प्रकारची स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. दक्षिण कोरियात लोक खूप काम करतात. इतकं की त्याला ‘शिक्षा’ म्हणजे ‘पनिशिंग वर्क कल्चर’ म्हटलं जातं! विकसित जगात त्यांचा ‘कामाचा दिवस सर्वांत मोठा’ असतो. ‘ओव्हरवर्क’ आणि त्यामुळे ‘बर्नआऊट’ होणं या गोष्टी तिथे सामान्य आहेत. दक्षिण कोरियात १९ ते ३४ वयोगटातील तरुणांना लक्ष्य करून २०२२मध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता. त्यात दर तिनातला एक जण अति ताणानं त्रस्त होता, जवळपास ३८ टक्के तरुणांना करिअरचं टेन्शन होतं, २१ टक्के तरुणांवर कामाचा ओव्हरलोड होता.. गेल्यावर्षी तिथे गाढ झोपेचीही स्पर्धा घेण्यात आली होती. जो सर्वाधिक गाढ झोपेल, तो जिंकला!