खोदकाम करताना सापडली ब्रिटीशकालीन चांदीची नाणी, मजूर नाण्यांचा कलश घेऊन फरार....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 10:12 IST2021-02-27T09:22:22+5:302021-02-27T10:12:10+5:30
Silver coins found in Dholpur : ज्या मजूराला नाणी सापडली तो पितळेचा कलश घेऊन तिथून पळाला आणि त्याच्या मागे इतरही मजूर पळू लागले. तर त्याने काही चांदीची नाणी त्यांच्या अंगावर फेकली.

खोदकाम करताना सापडली ब्रिटीशकालीन चांदीची नाणी, मजूर नाण्यांचा कलश घेऊन फरार....
राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील सपऊ उपखंडाच्या जुन्या बाजारात एका जुन्या हवेलीत खोदकाम करताना एका पितळेच्या कलशात चांदीची नाणी सापडल्याने एकच खळबळ उडाली. एकत्र इतकी चांदीची नाणी बघून मजूर थक्क झाला. जमिनीत चांदीची नाणी सापडल्याचं कळताच इतरही लोक तिथे जमा झाले.
ज्या मजूराला नाणी सापडली तो पितळेचा कलश घेऊन तिथून पळाला आणि त्याच्या मागे इतरही मजूर पळू लागले. तर त्याने काही चांदीची नाणी त्यांच्या अंगावर फेकली. लोकांनी ती लुटली. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पण तोपर्यंत मजूर नाणी घेऊन फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळावरून १४० चांदीची नाणी ताब्यात घेतली. तपासादरम्यान समोर आले की, ही चांदीची नाणी ब्रिटीश काळातील आहे. त्यावर एडवर्ड सातव्या राजा एम्परर असं लिहिलंय. प्रशासनाने ही नाणी ताब्यात घेतली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सपउ उपखंडातील जुन्या बाजारात राहणारे व्यापारी कृष्णा सेठ यांची जुनी हवेली तोडून नवीन बांधकाम करत आहेत. साधारण ६ ते ७ लोक तिथे पायाचं खोदकाम करत होते. खोदकाम करताना एका मजूराची कुदळ कलशावर लागली. जेव्हा त्याने माती बाजूला करून पाहिली तर त्याला कलश दिसला. त्यात साधारण १०० वर्ष जुनी चांदीची नाणी होती.
असा अंदाज लावला जात आहे की, ही नाणी १०० वर्ष जुनी आहेत. तहसीलदार आशरामा गुर्जर म्हणाले की, खोदकाम करताना चांदीची १४० नाणी सापडली. ते ताब्यात घेऊन ट्रेजरीमध्ये ठेवले आहेत. ही नाणी ब्रिटीश काळातील आहेत. इथे अजूनही नाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे पोलीस तैनात केले आहेत.