या ठिकाणी सापडला 2,492 कॅरेटचा जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा; किंमत तब्बल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 16:42 IST2024-08-23T16:42:00+5:302024-08-23T16:42:27+5:30
1905 मध्ये सापडलेल्या 'कलिनन' हिऱ्यानंतर हा दुसरा सर्वात मोठा हिरा आहे.

या ठिकाणी सापडला 2,492 कॅरेटचा जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा; किंमत तब्बल...
Largest Diamond : आफ्रिकन देश बोत्सवाना येथे जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा सापडला आहे. कॅनडाची डायमंड कंपनी लुकार डायमंट कॉर्पला हा 2,492 कॅरेटचा हिरा सापडला आहे. इतका मोठा हिरास सापडल्यामुळे कंपनीचे अधिकारी खूपच खूश आहेत. 'कलिनन' हिऱ्यानंतरचा हा दुसरा सर्वात मोठा हिरा आहे. कलिननचा शोध सुमारे एक शतकापूर्वी लागला होता. सध्या कलिनन ब्रिटिश राजघराण्यातील दागिन्यांमध्ये आहे.
एक्स-रे तंत्रज्ञानाच्या मदतीने हिरा शोधला
खाण कंपनीने सांगितले की, त्यांना पश्चिम बोत्सवाना येथील करोवे खाणीत हा हिरा सापडला आहे. एक्स-रे तंत्रज्ञानाच्या मदतीने हा उच्च दर्जाचा हिरा शोधण्यात आला आहे. शेकडो वर्षांत घडणारी दुर्मिळ घटना असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. विशेष म्हणजे, हा हिरा सापडताच लुकार कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली. या हिऱ्याची किंमत 40 मिलियन डॉलर्स, म्हणजेच 335 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याचे 9 तुकडे
1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कलिनन डायमंडनंतर हा दुसरा सर्वात मोठा हिरा आहे. खाण मालक थॉमस कलिनन यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले. कलिनन डायमंड 3,106 कॅरेटचा होता, त्याचे नंतर अनेक तुकडे केले गेले. त्यापैकी काही ब्रिटिश रॉयल ज्वेलरीचा भाग आहेत. 1907 मध्ये ब्रिटीश राजा एडवर्ड सातवा यांना हा हिरा देण्यात आला. त्यानंतर ॲमस्टरडॅमच्या जोसेफ आशेरने त्याचे विविध आकाराचे 9 तुकडे केले. कुलीनन हिऱ्याला आफ्रिकेचा ग्रेट स्टार असेही म्हणतात. त्याचा सर्वात मोठा तुकडा ब्रिटनचा राजा चार्ल्स यांच्या राजदंडात आहे.