उभ्या-उभ्या झोप घेणारा एकुलता एक प्राणी, घोड्याचं हे सीक्रेट वाचून नक्कीच व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:38 IST2025-12-29T16:38:05+5:302025-12-29T16:38:39+5:30
Horse Life Truth : खरं तर घोडा उभ्या अवस्थेतही झोपू शकतो आणि तरीसुद्धा तो सतर्क राहतो. यामागे त्याच्या शरीराची खास रचना आणि लाखो वर्षांची उत्क्रांती दडलेली आहे.

उभ्या-उभ्या झोप घेणारा एकुलता एक प्राणी, घोड्याचं हे सीक्रेट वाचून नक्कीच व्हाल अवाक्
Horse Life Truth : आपण घोडे अनेकदा बघितले असतील, पण त्यांना आपण नेहमी धावताना, उभे असलेले किंवा उभ्याने डुलकी घेतानाच पाहिलं असेल. घोडा आपण बसलेला क्वचितच बघतो. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो घोड्याला थकवा येत नाही का? की त्याची झोप माणसांपेक्षा वेगळी असते? खरं तर घोडा उभ्या अवस्थेतही झोपू शकतो आणि तरीसुद्धा तो सतर्क राहतो. यामागे त्याच्या शरीराची खास रचना आणि लाखो वर्षांची उत्क्रांती दडलेली आहे.
घोडा न बसण्यामागे सवय नाही, तर शारीरिक गरज कारणीभूत आहे. त्याची मणक्याची हाडे लांब आणि सरळ असतात. त्यामुळे तो जास्त वेळ बसला किंवा आडवा पडला तर त्याच्या पोटावर आणि फुफ्फुसांवर दबाव येतो, ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण होऊ शकते. म्हणूनच उभे राहणे त्याच्यासाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायक ठरते.
घोडे मुख्यपणे शिकारींचे भक्ष्य असलेले प्राणी आहेत. जंगलात आणि मोकळ्या मैदानात सिंह, लांडगे यांसारख्या शिकाऱ्यांचा धोका त्यांना कायम असायचा. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत तेच घोडे टिकून राहिले, जे धोका ओळखताच क्षणार्धात पळू शकत होते. उभे राहिल्यामुळे कोणतीही चाहूल लागताच ते त्वरित धाव घेऊ शकतात, तर बसलेल्या किंवा पडलेल्या अवस्थेत उठायला वेळ लागू शकतो.
घोड्याच्या शरीरात ‘स्टे अपॅरॅटस’ नावाची एक खास व्यवस्था असते. ही टेंडन, लिगामेंट आणि हाडांची अशी रचना आहे, जी पायांचे सांधे लॉक करून ठेवते. यामुळे घोडा फारसा स्नायूंवर ताण न देता बराच वेळ उभा राहू शकतो. गुडघे आणि घोट्यांमधील हे लॉकिंग सिस्टीम शरीराचा तोल राखते आणि उर्जा खर्चही खूप कमी करते.
याच व्यवस्थेमुळे घोडा उभ्या अवस्थेत हलकी झोप घेऊ शकतो. या वेळी त्याचा मेंदू पूर्णपणे बंद होत नाही, तर अंशतः जागृत राहतो, आणि शरीराला विश्रांती मिळते. त्यामुळे तो पडत नाही आणि धोका जाणवताच लगेच प्रतिक्रिया देण्यासाठी तयार असतो.