अजब-गजब प्रकार! २० वर्ष जुन्या कडुलिंबाच्या झाडातून वाहू लागली धारा, तपासणीला लोक आले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:35 IST2025-02-19T16:32:14+5:302025-02-19T16:35:36+5:30
Neem Tree Liquid Flowing: गेल्या २० दिवसांपासून झाडातून ही धारा अखंड सुरूच आहे

अजब-गजब प्रकार! २० वर्ष जुन्या कडुलिंबाच्या झाडातून वाहू लागली धारा, तपासणीला लोक आले अन्...
Neem Tree Liquid Flowing: हरयाणातील जिंद येथे खरकभूरा नावाचे एक गाव आहे. तेथे जरा हटके प्रकार घडला आहे. अचानक २० वर्ष जुन्या कडुलिंबाच्या झाडातून एक पांढऱ्या द्रव पदार्थाची धारा बाहेर येऊ लागला, जो अगदी दुधासारखा दिसत होता. याची बातमी लोकांना मिळताच ते भांडी घेऊन तिथे पोहोचले आणि तो द्रव पदार्थ घरी घेऊन जाऊ लागल्याची घटना घडली. काही लोकांनी याला चमत्कार मानले आणि कडुलिंबाच्या झाडाची पूजा करण्यास सुरुवात केली. त्यानंतरच आरोग्य विभागाला याची माहिती मिळाली. आरोग्य विभागाचे पथक तात्काळ गावात पोहोचले आणि त्यांनी द्रवाचा नमुना घेतला. तसेच लोकांना चुकूनही हे द्रव सेवन करू नका असे आवाहन केले. गेली २० दिवस ही धारा अखंड सुरुच आहे.
गावकऱ्यांचे म्हणणे काय?
गावकरी म्हणतात की झाडातून बाहेर पडणारा द्रव नारळाच्या पाण्यासारखा आहे तर काहींच्या मते तो पदार्थ दूधासारखा आहे. बाहेर पडणाऱ्या पांढऱ्या द्रवाचा वापर करू नका, असे आवाहन प्रशासनाने ग्रामस्थांना केले आहे. तरीही काही लोक हे द्रव बाटल्यांमध्ये भरून घरी घेऊन जात आहेत.
तपासणीला कोण आले?
मंगळवारी आरोग्य, वन, पंचायत आणि सार्वजनिक आरोग्य विभागांचे पथक कडुलिंबाच्या झाडातून बाहेर पडणाऱ्या द्रवाची तपासणी करण्यासाठी पोहोचले. उचाना येथील आरोग्य विभागाच्या पथकातील एमपीएचडब्ल्यू विक्रम श्योकंद म्हणाले की, ही एक रासायनिक प्रक्रिया असू शकते. कडुलिंबाच्या झाडातून बाहेर पडणाऱ्या पाण्यात कोणताही चमत्कार नाही. गावकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नये.
काय आहे हा पदार्थ?
वन विभागाने सांगितले की, हा झाडांमध्ये बुरशीजन्य संसर्गासारखा आजार आहे. कोणत्याही तपासणीशिवाय या पाण्याचा वापर करणे प्राणघातक ठरू शकतो. सरपंच प्रतिनिधी संजीव आणि कानुंगो रामबिलास यांनी लोकांना हे सविस्तरपणे समजावून सांगितले. वनाधिकाऱ्यांनी सांगितले की, झाडाचा पडदा फुटल्यामुळे हे घडू शकते. ज्यामुळे झाड पाणी शोषू शकत नाही आणि ते हे पाणी बाहेर फेकून देते.