भारतातील एक अनोखं रेल्वे स्टेशन ज्याला नाही कोणतंही नाव, पिवळा बोर्ड आजही कोराच; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:17 IST2026-02-06T12:56:41+5:302026-02-06T13:17:49+5:30
Railway Interesting Facts : आपल्याला माहीत नसेल की, देशात एक असंही रेल्वे स्टेशन आहे ज्याला नावच नाही. या स्टेशनवर पिवळा बोर्डही आहे, पण त्यावरील नावच बेपत्ता झालंय.

भारतातील एक अनोखं रेल्वे स्टेशन ज्याला नाही कोणतंही नाव, पिवळा बोर्ड आजही कोराच; कारण...
Railway Interesting Facts : भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. दिवसभरात साधारण १३ हजारांपेक्षा जास्त रेल्वे देशातील ७,३०० स्टेशनांदरम्यान धावतात. रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करताना वेगवेगळे स्टेशन दिसतात आणि पिवळ्या बोर्डवर असलेली त्यांची नावंही दिसतात. सगळ्याच स्टेशनवर पिवळ्या बोर्डवर नावं लिहिलेली असतात. पण आपल्याला माहीत नसेल की, देशात एक असंही रेल्वे स्टेशन आहे ज्याला नावच नाही. या स्टेशनवर पिवळा बोर्डही आहे, पण त्यावरील नावच बेपत्ता झालंय.
अर्थात कुणालाही प्रश्न पडू शकतो की, एखादं रेल्वे स्टेशन नावाविना कसं असू शकतं? पण हे खरं आहे. त्यामुळे हे रेल्वे कोणतं, त्याला नाव का नाही, ते कुठे आहे? हे आपण जाणून घेणार आहोत. तर हे बेनाम रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमध्ये आहे. हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या बर्धमानपासून जवळपास ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
गावांच्या भांडणात अडकलं रेल्वे स्टेशन
बांकुरा-मेसग्राम रेल्वे लाइनवर असलेले हे रेल्वे स्टेशन रैना आणि रैनागढ या दोन गावांच्या मधे आहे. सुरुवातीला या गावाला रैनागढ नावाने ओळखलं जात होतं. स्टेशनला रैनागढ नाव मिळाल्याने रैनागढमधील लोक आनंदी होते. पण रैना गावातील लोकांना हे मान्य नव्हतं. यावरून वाद सुरू झाला. कारण या रेल्वे स्टेशनच्या इमारतीचं बांधकाम रैना गावातील जमिनीवर करण्यात आलं होतं. त्यामुळे रैना गावातील लोकांना असं वाटत होतं की, या रेल्वे स्टेशनचं नाव रैनागढ नाही तर रैना असायला हवं. झालं हाच मुद्दा भांडणाचं कारण ठरला.
भांडण रेल्वे बोर्डाच्या दारात
स्टेशनच्या नावावरून दोन्ही गावांमध्ये भांडण सुरू झालं होतं. नंतर या स्टेशनच्या नावावरून सुरू झालेलं भांडण रेल्वे बोर्डापर्यंत पोहोचलं आहे. बोर्डाने दोन्ही गावातील लोकांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. शेवटही हा मुद्दा कोर्टात पोहोचला. नंतर भारतीय रेल्वेने इथे लावण्यात आलेले सगळेच साइन बोर्ड हटवले. तेव्हापासून आतापर्यंत हे रेल्वे स्टेशन नावाशिवायच सेवा देत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, तिकीट अजूनही जुन्या रैनागढ या नावानेच दिलं जातं.
कोणतं स्टेशन दोन राज्यात विभागलं?
देशात कितीतरी रेल्वे स्टेशन आहेत. पण देशात एक असंही रेल्वे स्टेशन आहे, जे दोन देशात विभागलेलं आहे. म्हणजे ते अर्ध दुसऱ्या राज्यात आणि अर्ध वेगळ्या राज्यात आहे. या रेल्वे स्टेशनचं नाव आहे नवापुर रेल्वे स्टेशन. हेच ते रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यात म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विभागलं गेलं आहे. या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहे, उरलेला अर्धा भाग गुजरातच्या तापीमध्ये आहे.