एकही दार आणि खिडकी नसलेली देशातील एकमेव रेल्वे, कशासाठी वापरली जाते 'ही' रेल्वे आणि अशी का असते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:59 IST2026-02-12T14:58:46+5:302026-02-12T14:59:45+5:30
Railway Interesting Facts: भारतात एक अशी रेल्वे आहे जिला ना दारं असतात, ना खिडक्या. चला तर पाहुया ही रेल्वे कोणती आहे अशी का असते आणि कशासाठी वापरली जाते?

एकही दार आणि खिडकी नसलेली देशातील एकमेव रेल्वे, कशासाठी वापरली जाते 'ही' रेल्वे आणि अशी का असते?
Railway Interesting Facts: भारतीय रेल्वे आपली कात टाकत आहे. अनेक आधुनिक रेल्वे, नवीन मार्ग, सोयी - सुविधांची कामं वेगाने सुरू आहेत. भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेच्या वेगळ्या आणि आठवणीत राहणाऱ्या प्रवासाचा आनंद घेतला असेल.
रेल्वेच्या दारात उभे राहून किंवा खिडकीतून गार वाऱ्याचा आनंद घेत बाहेरचे नजारे पाहिले असतील. येणाऱ्या - जाणाऱ्या रेल्वेही पाहिल्या असतील. सगळ्याच रेल्वेंना दारं आणि खिडक्या दिसल्या असतील. पण आपण कधी एकही दार किंवा खिडकी नसलेली रेल्वे पाहिली का? होय...भारतात एक अशी रेल्वे आहे जिला ना दारं असतात, ना खिडक्या. चला तर पाहुया ही रेल्वे कोणती आहे अशी का असते आणि कशासाठी वापरली जाते?
काय म्हणतात या रेल्वेला?
क्वचितच काही लोकांना माहीत असेल की, रेल्वेकडून NMG म्हणजेच New Modified Goods रेल्वे चालवली जाते. ही रेल्वे एक खासप्रकारची मालगाडी असते. जी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मौल्यवान वस्तू पोहोचवते. ही एनएमजी रेल्वे दिसायला तर पूर्णपणे पॅसेंजर गाडी दिसते. पण यात खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे पॅक असतात. तर या रेल्वेचा स्पीड ७५ किमी प्रति तास इतका असल्याचं सांगितलं जातं.
कशी बनवतात एनएमजी रेल्वे?
तर रेल्वे पॅसेंजर गाड्यांमधील ICF कोचचं जीवन हे २० ते २५ वर्षांचं असतं. बऱ्याच पॅसेंजर गाड्यांमधील कोच तर २ वर्षांतच जीव सोडतात. त्यामुळे अशा कोचचा वापर केला जात नाही. मग हेच कोच पुन्हा वापरण्यासाठी पुन्हा तयार केले जातात. हे कोच ऑटो कॅरिअरमध्ये बदलले जातात आणि त्यांना एनएमजी रेल्वे असं नाव दिलं जातं. कार, मिनी ट्रक आणि ट्रॅक्टर लोडिंग करता येईल अशा पद्धतीने यांचं डिझाइन केलं जातं.
एनएमजी रेल्वेतील खिडक्या - दारं पॅक का असतात?
NMG रेल्वेची खास बाब म्हणजे याची दारं आणि खिडक्या पॅक केल्या जातात. Periodic Overhauling साठी पाठवण्यात आल्यानंतर पॅसेंजर कोचची तपासणी केली जाते, त्यानंतर त्यात काही बदल केले जातात. या रेल्वेत कार, ट्रॅक्टर आणि इतरही मौल्यवान वाहने असतात.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पोहोचण्यासाठी या रेल्वेला वेळही भरपूर लागतो. यादरम्यान आत ठेवलेल्या वस्तूंसोबत कुणी छेडछाड करू नये, त्यांची चोरी करू नये यासाठी रेल्वेच्या खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे पॅक केले जातात. ही रेल्वे एकाचवेळी २०० ते २५० कार वाहून नेऊ शकते.