'या' एका व्यक्तीमुळे रेल्वेत बसवण्यात आले होते टॉयलेट, वाचा फारच इंटरेस्टिंग आहे यामागची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:22 IST2026-01-23T13:21:40+5:302026-01-23T13:22:36+5:30
Indian Railway Facts : आपल्याला विश्वासही बसणार नाही की, एक वेळ अशीही होती जेव्हा भारतीय रेल्वेत टॉयलेट नसायचे. मात्र, एका व्यक्तीमुळे हे शक्य झालं.

'या' एका व्यक्तीमुळे रेल्वेत बसवण्यात आले होते टॉयलेट, वाचा फारच इंटरेस्टिंग आहे यामागची कहाणी
Indian Railway Facts: रेल्वेने लांबचा प्रवास करायचा असेल आणि जर रेल्वेत टॉयलेटच नसेल तर विचार करा काय स्थिती होईल...किती वेळ कंट्रोल करणार? खरंतर याचा विचारही करवत नाही. पण आपल्याला विश्वासही बसणार नाही की, एक वेळ अशीही होती जेव्हा भारतीय रेल्वेत टॉयलेट नसायचे. तेव्हा लोकांसाठी रेल्वेने लांबचा प्रवास करणं आव्हानच होतं. आता तर प्रत्येक रेल्वेत, इतकंच नाही तर डब्या डब्यांमध्ये टॉयलेटची सोय असते. पण प्रश्न हा आहे की, हा बदल झाला कसा आणि कुणामुळे झाला? आज आपण रेल्वेत टॉयलेट सुरू होण्यामागची अनोखी कहाणी जाणून घेणार आहोत.
एका व्यक्तीमुळे झाला बदल
१८५३ मध्ये भारतीय रेल्वेला सुरूवात झाली. तेव्हा आतासारखे पॅसेंजर कोचमध्ये कोणतीही टॉयलेटची सुविधा नव्हती. अशात लांबचा प्रवास करणं खरंतर एक आव्हानच होतं आणि प्रवाशांना टॉयलेटला जाण्यासाठी रेल्वे पुढच्या स्टेशनला थांबण्याची वाट बघावी लागत होती. बरीच वर्ष हे असंच चालत राहिलं.
पुढे १९०९ साली एक अशी घटना घडली, ज्यामुळे रेल्वेत टॉयलेटची सोय झाली. झालं असं होतं की, अखिल चंद्र सेन नावाची एक व्यक्ती रेल्वेने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान काही कारणाने त्याचं पोट बिघडलं आणि फ्रेश होण्यासाठी त्याना एका स्टेशनला उतरावं लागलं. सेन रेल्वेत पुन्हा बसणार इतक्या रेल्वे सुरू झाली. एका हातात पाण्याचं भांडं आणि दुसऱ्या हाताने धोतर पकडून ही व्यक्ती रेल्वेच्या मागे धावू लागली. धावत असताना व्यक्ती पडली आणि रेल्वे सुटली.
रेल्वे विभागाला पत्र आणि...
या घटनेनंतर अखिल चंद्र सेन यांनी साहिबगंज डिव्हिजनल रेल्वे ऑफिसला रागाच्या भरात तक्रार करणारं एक पत्र लिहिलं आणि टॉयलेटची सेवा नसण्याबाबत खंत व्यक्त केली. रेल्वेत टॉयलेट हवेत या त्यांच्या विनंतीकडे रेल्वे अधिकाऱ्यांचं लक्ष गेलं. त्यामुळे असं मानलं जातं की, सेन यांनी केलेल्या तक्रारीमुळेच भारतीय रेल्वेत टॉयलेटला सुरूवात झाली. आजही या व्यक्तीने रेल्वे विभागाला लिहिलेलं पत्र दिल्लीच्या नॅशनल रेल्वे म्युझिअममध्ये सांभाळून ठेवण्यात आलं आहे.
रेल्वेच्या इंजिनात टॉयलेट का नसतं?
काही रिपोर्ट्सनुसार, इंजिनामध्ये लोको पायलटला बसण्यासाठी केवळ एक सीट असते. रेल्वेच्या इंजिनात टॉयलेट नसतं कारण इंजिनात जागेची कमतरता असते. इंजिन केवळ टेक्निकल उपकरणे आणि कंट्रोल पॅनलने भरलेलं असतं. तसेच सुरक्षेच्या कारणांनी सुद्धा इंजिनात टॉयलेट असणं शक्य नाही. इंजिन फारच संवेदनशील असतं आणि टॉयलेटसारखी व्यवस्था सुरक्षेसाठी धोका ठरू शकते. त्यामुळे यात केवळ आवश्यक उपकरणेच असतात.
मग कसं मॅनेज करतात लोको पायलट?
आधी हे जाणून घ्या की, भारतीय रेल्वे आता काही रेल्वेंच्या इंजिनांमध्ये छोटे पोर्टेबल किंवा वॉटर-लेस टॉयलेट लावण्याचा विचार करत आहे. जेणेकरून लोको पायलटची सोय व्हावी. पण सध्या तर लोको पायलट टॉयलेटला जाण्यासाठी पुढील स्टेशन येण्याची वाट बघत असतात. किंवा मग पोर्टेबल सुविधांचा आधार घेतात. त्यांना पुढील स्टेशनवर टॉयलेटला जाण्याचा वेळ मिळतो. स्टेशनवर लोको पायलटसाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था केलेली असते.