आधी पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं, चार दिवसांनी तिला परत घेऊन आला; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 19:29 IST2025-04-01T19:28:45+5:302025-04-01T19:29:49+5:30

UP News : काही दिवसांआधीच उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरच्या एका गावात राधिका नावाच्या महिलेनं दोन मुलं आणि पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

Husband who got his wife married to her lover get her back after four days of marriage | आधी पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं, चार दिवसांनी तिला परत घेऊन आला; कारण...

आधी पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं, चार दिवसांनी तिला परत घेऊन आला; कारण...

UP News : दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलं असलेल्या आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून देण्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. काही चार ते पाच दिवसांआधी अशीच एक घटना चर्चेत आली होती. एका पतीनं त्याच्या पत्नीचं लग्न सगळ्या गावासमोर तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं होतं. पण आता या कहाणीत एक ट्विस्ट आला आहे. पत्नीच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिल्यानंतर पती पत्नीला चार दिवसात घरी परत घेऊन आला. 

काही दिवसांआधीच उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगरच्या एका गावात राधिका नावाच्या महिलेनं दोन मुलं आणि पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पत्नीच्या इच्छेखातर पती बबलू यानं तिचा प्रियकर विकाससोबत तिचं लग्न लावून दिलं. पण आता तो चार दिवसातच आपल्या पत्नीला परत घेऊन आला.

चार दिवसातच या अजब कहाणीमध्ये ट्विस्ट आला. प्रियकर विकाससोबत गेलेली राधिका पती बबलूसोबत परत आली. 28 मार्च रोजी बबलू पत्नीला घेण्यासाठी विकासच्या घरी गेला होता. बबलूनं विकासला विनंती केली की, त्यानं त्याची पत्नी त्याला परत करावी. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर विकासनं राधिकाला बबलूच्या हवाली केलं.

विकासच्या आईनं सांगितलं की, आम्ही आधीच लग्नाला विरोध केला होता. पण लोकांना जबरदस्ती त्यांचं लग्न लावून दिलं होतं. बबलू सायंकाळी आला होता आणि म्हणाला की, दोन मुलांना तो सांभाळू शकत नाहीये. त्याच्याकडून चूक झाली. दोघांनी चर्चा केल्यानंतर विकास राधिकाला त्याच्यासोबत परत पाठवण्यास तयार झाला. विकास आता कामासाठी बाहेरगावी गेला आहे. तर बबलू पत्नीला घेऊन शहरात राहत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 2017 साली बबलू आणि राधिकाचं लग्न झालं होतं. दोघांना दोन मुलं आहेत. काही महिन्यांनी बबलू मजुरीचं काम करण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेला. त्यानंतर त्याची पत्नी राधिका गावातीलच विकासच्या प्रेमात पडली. अलिकडेल बबलूला याची माहिती मिळाली होती. अशात त्यानं भांडण करण्याऐवजी पत्नीचं लग्न विकाससोबत लावून देण्याचा निर्णय घेतला. 

गावातील लोकांसोबत बोलल्यानंतर बबलूनं पत्नी राधिकाचं लग्न विकाससोबत लावण्याचं ठरवलं. हिंदू रिती-रिवाजासोबत त्यानं पत्नीचं लग्न विकाससोबत मंदिरात लावून दिलं. कोर्टात जाऊनही त्यानं तसा अर्ज केला. लग्नानंतर बबलूनं नवरी-नवरदेवासोबत फोटोही काढला. पण चार दिवसांनंतर त्याला पत्नीचं आठवण येऊ लागली होती. त्यानंतर तो पत्नीला घेऊन आला.

Web Title: Husband who got his wife married to her lover get her back after four days of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.