आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:06 IST2025-11-14T14:05:22+5:302025-11-14T14:06:14+5:30
चीनचे शास्त्रज्ञ एक अशी गोळी विकसित करत आहेत जी माणसांचं आयुष्य थेट १५० वर्षांपर्यंत वाढवू शकते.

आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
चीनचे शास्त्रज्ञ आता एक अशी गोळी विकसित करत आहेत जी माणसांचं आयुष्य थेट १५० वर्षांपर्यंत वाढवू शकते. शेन्झेनची बायोटेक कंपनी लॉनवी बायोसायन्सेस या औषधावर काम करत आहे. ही कंपनी एक अँटी एजिंग गोळी विकसित करत आहे. गोळीतील मुख्य घटक प्रोस्यानिडिन सी1 (पीसीसी१) आहे, जो द्राक्षाच्या बियांच्या अर्कामध्ये आढळतो. कंपनीचा दावा आहे की, ही गोळी कमकुवत पेशी नष्ट करेल आणि चांगल्या पेशींचं रक्षण करेल. यामुळे माणसांचं आयुष्य वाढू शकतं. मात्र काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, हा फक्त एक दावा आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्यांची आवश्यकता आहे.
२०२१ मध्ये नेचर मेटाबोलिझम जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासावर हा रिसर्च आधारित आहे. त्याची चाचणी उंदरांवर करण्यात आली. पीसीसी१ ने निरोगी पेशी जपताना उंदरांमधील जुन्या पेशी निवडकपणे नष्ट केल्या. परिणामी औषध घेणाऱ्या उंदरांचं सरासरी आयुष्यमान ९ टक्क्यांनी वाढलं. उपचारानंतरच्या आयुर्मानाचा विचार केला तर ते ६४.२ टक्के जास्त होते.
कंपनीचे सीईओ, यिप त्सझो (जिको) यांनी या गोळीला 'लॉन्गेविटी साइंस का होली ग्रेल' म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की निरोगी जीवनशैलीसह, १५० वर्षांपर्यंत जगणं काही वर्षांतच खरं होऊ शकते. कंपनी आता माणसांसाठी गोळी विकसित करत आहे. परंतु इतर शास्त्रज्ञ सावध आहेत. बक इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन एजिंगमधील तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, उंदरांमध्ये परिणाम आशादायक असले तरी, त्यांचे माणसांमध्ये ही प्रक्रिया अत्यंत कठीण आहे.
तज्ज्ञांनी पुढे म्हटलं की, ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. औषधाची प्रभावीता आणि सुरक्षितता सिद्ध करण्यासाठी मोठ्या आणि कठोर क्लिनिकल चाचण्या आवश्यक आहेत. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, माणसाचं आयुष्य इतक्या प्रमाणात वाढवण्याच्या दाव्यांसाठी ठोस संशोधन पुरावे आवश्यक आहेत. चीनमध्ये दीर्घायुष्य संशोधनाला राष्ट्रीय प्राधान्य देण्यात आले आहे, ज्यामध्ये सरकारी आणि खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
चिनी शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, विज्ञान वेगाने प्रगती करत आहे, परंतु १५० वर्षांपर्यंत जगणं अजूनही स्वप्नासारखं वाटतं. अँटी-एजिंग रिसर्च जगभरात वाढत आहे, परंतु खऱ्या यशाला वेळ लागेल. हा शोधाबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. याच दरम्यान डॉक्टरांचा सल्ला आहे की, निरोगी राहा, सकस आहार घ्या, व्यायाम आणि चांगल्या सवयी हे सध्याचं सर्वोत्तम औषध आहे.