रविवार हाच दिवस वीकऑफसाठी कसा निवडण्यात आला? आपल्याला माहीत नसेल यामागची रंजक कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:59 IST2026-03-09T14:59:01+5:302026-03-09T14:59:31+5:30
Interesting Facts : रविवार हाच दिवस सुट्टी दिवस म्हणून कसा निवडला गेला? रविवार हा दिवस साप्ताहिक सुट्टीसाठी निवडण्याची कहाणी फारच इंटरेस्टिंग आहे.

रविवार हाच दिवस वीकऑफसाठी कसा निवडण्यात आला? आपल्याला माहीत नसेल यामागची रंजक कहाणी
Interesting Facts : आठवड्यातील सात दिवसांपैकी रविवारची वाट मोठ्या आतुरतेने बघितली जाते. इतकंच काय तर रविवार असा उल्लेख झाला तरी चेहऱ्यावर एक दिलासादायक हसू फुलतं. हा दिवस कुटुंबासोबत वेळ घालवण्यासोबतच कामातून थोडा ब्रेक घेण्याचा असतो. भारतात रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. बहुतेक लोकांना रविवारीच सुट्टी असते. शाळा, सरकारी ऑफिसेस, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा रविवारी सुट्टी असते. पण आपल्याला माहीत नसेल की, आधी असं नव्हतं. रविवार हा दिवस साप्ताहिक सुट्टीसाठी निवडण्याची कहाणी फारच इंटरेस्टिंग आहे.
ब्रेक न घेता करावं लागत होतं काम
आज आपण ज्या वीकेंडचा आनंद घेतो, तो नेहमीच तसा नव्हता. ब्रिटीश काळात भारतात खासकरून मुंबईच्या सूत गिरणींमध्ये काम करणाऱ्या मजुरांची स्थिती फारच दयनीय होती. त्यांना आठवड्यातील सातही दिवस काम करावं लागत असे. लागोपाठ इतके दिवस काम करावं लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडत होता. याच त्यांच्या अवघड काळात त्यांचे हिरो बनले नारायण मेघाजी लोखंडे.
सात वर्षांची लढाई आणि न्याय
मजुरांची स्थिती पाहून लोखंडे यांनी त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवला. १८८१ ते १८८४ दरम्यान त्यांनी आंदोलने केली आणि ब्रिटिश सरकारला अनेक संदेश पाठवले. लोखंडे यांच्या एका हाकेवर हजारो मजूर एकत्र आले होते. पण हा काही छोटा लढा नव्हता. हे आंदोलन तब्बल ७ वर्ष चाललं. शेवटी मजुरांची एकजुटता आणि लोखंडे यांच्या प्रयत्नासमोर ब्रिटिश सरकारला झुकावं लागलं आणि १० जून १८९० मध्ये भारतात रविवारी हा दिवस अधिकृतपणे साप्ताहिक सुट्टी दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
रविवारच का निवडला?
रविवार हा दिवस सुट्टी म्हणून निवडण्यामागे धार्मिक आणि व्यावहारिक अशी दोन कारणे होती. त्यावेळी भारतात ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिश हे ख्रिश्चन धर्म पाळत होते. त्यांच्यासाठी रविवार हा चर्चेमध्ये जाण्याचा दिवस होता. त्यामुळे रविवार हाच सुट्टीचा दिवस ठरला. एक तर्क भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माशी जोडूनही देण्यात आला की, रविवार हा दिवस सूर्य देव आणि भगवान खंडोबाला समर्पित आहे. इंग्रजांप्रमाणे भारतीय मजुरांना देखील आराम आणि पूजेसाठी एक दिवस मिळायला हवा.
१७०० वर्ष जुना इतिहास
आश्चर्याची बाब म्हणजे रविवारी सु्ट्टी असण्याची सुरूवात भारतात झाली नाही. याचा इतिहास फार जुना आहे इसवी सन ३२१ मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टेंटाइन द ग्रेट याने सगळ्यात आधी रोमन साम्राज्यात रविवार हा दिव आरामाचा दिवस घोषित केला होता. हळूहळू ही परंपरा यूरोप आणि नंतर ब्रिटनमध्ये सुरू झाली. ब्रिटिश लोक ही परंपरा भारतात घेऊन आले.