थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याआधी किती वेळ दाखवू शकतात जाहिराती, काय असतो नियम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 16:25 IST2025-02-24T16:24:30+5:302025-02-24T16:25:24+5:30
Theatre Advt Rule : तुम्ही बघितलं असेल तर थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याआधी जाहिराती दाखवल्या जातात आणि या जाहिराती साधारण २५ ते ३० मिनिटांपर्यंत सुरू राहतात.

थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याआधी किती वेळ दाखवू शकतात जाहिराती, काय असतो नियम?
Theatre Advt Rule : तुम्ही अनेकदा मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत थिएटरमध्ये सिनेमा बघण्यासाठी गेले असालच. आजकाल वेगवेगळ्या मॉल्समध्ये मल्टिप्लेक्स असतातच. यात सिनेमा बघण्याची एक वेगळीच मजा येते. मात्र, तुम्ही बघितलं असेल तर थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याआधी जाहिराती दाखवल्या जातात आणि या जाहिराती साधारण २५ ते ३० मिनिटांपर्यंत सुरू राहतात.
जवळपास सगळ्याच थिएटरमध्ये हा प्रकार होतो. थिएटर मालक तिकीटावर सिनेमा सुरू होण्याची जी वेळ देतात, त्या वेळेला सिनेमा सुरूच होत नाही. इच्छा नसूनीही लोकांना जाहिराती बघत बसावं लागतं. असाच एक वैतागलेला प्रेक्षक याविरोधात कोर्टात गेला. त्यानंतर कोर्टानं PVR INOX ला खडे बोल सुनावत दंडही ठोठावला आहे. अशात थिएटरमध्ये किती वेळ जाहिराती दाखवल्या जाऊ शकतात, याबाबत काय नियम आहेत हे जाणून घेऊ.
थिएटर विरोधात कोर्टात
बंगळुरूचा राहणारा अभिषेक एमआरनं ग्राहक कोर्टात पीव्हीआर, आयनॉक्स आणि बुक माय शो विरोधात तक्रार केली होती. त्याचा आरोप होता की, थिएटरमध्ये सिनेमाआधी २५ ते ३० मिनिटांपर्यंत जाहिराती दाखवून त्याचा वेळ वाया घालवला. ज्यामुळे त्याला मानसिक त्रासही झाला. कोर्टानं याबाबत निर्णय देत थिएटरला खडे बोल सुनावले. तसेच प्रेक्षकाच्या मानसिक त्रासाची आणि असुविधेची नुकसानभरपाई म्हणून २० हजार रूपये दंड ठोठावला. सोबतच कोर्टासाठी लागलेला खर्च म्हणून ८ हजार रूपये सुद्धा देण्यास सांगितलं. त्याशिवाय १ लाख रूपये ग्राहक कल्याण कोषात जमा करण्यास सांगितले.
जाहिरातींबाबत काय आहे नियम?
याप्रकरणी सुनावणी दरम्यान पीव्हीआरकडून वेगवेगळं तर्क-वितर्क लावण्यात आले. पीव्हीआरनं सांगितलं की, सिनेमा सुरू होण्याआधी दाखवण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये सार्वजनिक सेवांच्या घोषणांचा समावेश होता. पण कोर्टानं याबाबत स्पष्ट केलं की, थिएटरमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार सार्वजनिक सेवाबाबत घोषणा आणि कल्याणकारी योजनांच्या जाहिराती केवळ १० मिनिटंच दाखवू शकतात. सिनेमाआधी दाखवण्यात आलेल्या जाहिराती इंटरव्हलमध्ये दाखवल्या जाऊ शकतात. जेणेकरून सिनेमा बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचा वेळ वाया जाऊ नये. अशात प्रेक्षकांना हा अधिकार आहे की, अशा अनावश्यक जाहिराती विरोधात ग्राहक कोर्टात जाऊ शकतात.