जहाजातून आणलेला गॅस आपल्या किचनपर्यंत कसा पोहोचतो? पाहा काय असते पूर्ण प्रोसेस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:20 IST2026-03-19T16:19:31+5:302026-03-19T16:20:02+5:30
LPG Gas : अनेकांना प्रश्न पडत असेल की, जहाजातून आणला गेलेला गॅस आपल्या किचनपर्यंत कसा पोहोचतो? हीच पू्र्ण प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत.

जहाजातून आणलेला गॅस आपल्या किचनपर्यंत कसा पोहोचतो? पाहा काय असते पूर्ण प्रोसेस...
LPG Gas : इस्त्राइल आणि अमेरिकेने मिळून इराणवर केलेल्या हल्ल्याचा प्रभाव आता जगभरातील देशांवर जाणवू लागलाय. कच्च्या तेलाचे भाव वेगाने वाढत आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्याने तेलाच्या पुरवठा ठप्प झालाय. यामुळे आशियातील बऱ्याच देशांमध्ये मोठं संकट उभं राहिलं आहे. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं बोललं जातंय. काही ठिकाणी गॅसची बुकिंग होत नाहीये तर काही ठिकाणी डिलिव्हरी वेळेवर होत नाहीये. अशात दिलासादायक बातमी अशी आहे की, LPG गॅसने भरलेली 'शिवालिक' आणि 'नंदा देवी' ही दोन जहाजं स्ट्रेट ऑफ होर्मुजहून भारतात दाखल झाली आहेत. पण अनेकांना प्रश्न पडत असेल की, जहाजातून आणला गेलेला गॅस आपल्या किचनपर्यंत कसा पोहोचतो? हीच पू्र्ण प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत.
गॅस जहाजातून घरापर्यंत कसा पोहोचतो?
LPG हा मुख्यपणे कच्चं तेल आणि नैसर्गिक गॅसच्या प्रक्रियेदरम्यान By-product च्या रूपात तयार होतो. हे प्रोपेन आणि ब्यूटेन गॅसचं एक मिश्रण आहे. जे नंतर हाय प्रेशरवर लिक्विडमध्ये बदलून सिलेंडरमध्ये भरलं जातं. नंतर शिपिंगदरम्यान हा फार कमी तापमानावर लिक्विडमध्ये बदलून जहाजांवर लोड केला जातो. समुद्री जहाज गॅसची ही खेप घेऊन दाहेज (गुजरात), मंगळुरु (कर्नाटक) किंवा विशाखापट्टनम (आंध्र प्रदेश) टर्मिनलपर्यंत येतात.
टर्मिनलवर पोहोचल्यावर काय?
गॅसची खेप घेऊन आलेले जहाज बंदरांवर पोहोचल्यावर -42 डिग्री सेल्सियस तापमानावर लिक्विड अवस्थेत असलेल्या एपीजीला जहाजातून काढून भव्य कोल्ड स्टोरेज टँक्समध्ये सुरक्षित केलं जातं. नंतर या मोठ्या स्टोरेज टँकने गॅस पाइपलाईनच्या माध्यमातून देशभरात असलेल्या बॉटलिंग प्लांट्सपर्यंत पाठवला जातो. त्यानंतर रिकाम्या सिलेंडरची चांगली तपासणी केल्यानंतर प्रत्येक सिलेंडरमध्ये योग्य प्रमाणात एलपीजी गॅस भरला जातो.
एलपीजी गॅस हा गंधहीन असतो, त्यामुळे त्यात Mercaptan नावाचा पदार्थ मिक्स केला जातो. जेणेकरून लीकेज झाल्यावर लगेच कळावं. पुढे भरलेले हे सिलेंडर ट्रकमध्ये टाकून स्थानिक गोदामांमध्ये पाठवले जातात. नंतर आपण गॅसची बुकिंग केल्यानंतर आपल्या एजन्सी आपल्या दारात सिलेंडर आणून देतात.