तेल जमिनीखाली तयार तरी कसं होतं आणि ते काही ठिकाणीच का आढळतं? समजून घ्या पूर्ण प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:49 IST2026-04-03T12:49:13+5:302026-04-03T12:49:45+5:30
Oil Formation : तेल किंवा पेट्रोल फक्त काही ठरावितक जागेंवरच का आढळतं आणि ते जमिनीखाली कसं तयार होतं? आपल्याला सुद्धा असे प्रश्न पडले असतील. समजून घेऊया तेल तयार होण्याची पूर्ण प्रक्रिया.

तेल जमिनीखाली तयार तरी कसं होतं आणि ते काही ठिकाणीच का आढळतं? समजून घ्या पूर्ण प्रक्रिया
Oil Formation : मध्यपू्र्वेत इराण, अमेरिका - इस्त्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे काही देशांमध्ये तेलाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. अनेक देशांचा तेल पुरवठा बंद झालाय. अशात इराण, सौदीसारख्या इतरही तेल समृद्ध देशांमधील तेलाबाबत चर्चा सुरू झाली. अनेकांना प्रश्न पडलेत की, तेल किंवा पेट्रोल फक्त काही ठरावितक जागेंवरच का आढळतं आणि ते जमिनीखाली कसं तयार होतं? आपल्याला सुद्धा असे प्रश्न पडले असतील. अशात आज आपण जमिनीखाली तेल तयार होण्याची प्रक्रिया समजून घेणार आहोत.
जमिनीखाली तेल कसं तयार होतं?
जमिनीत तेल येतंच कुठून?तेल जमिनीत काही ठिकाणीच का तयार होतं? असे प्रश्न पडणं साहजिक आहे. मुळात तेल तयार होण्याची प्रक्रिया ही खूप काळ चालणारी आणि हळूवार अशी असते. जमिनीखाली तेल तयार होण्याच्या प्रक्रियेला जीवाश्म इंधन असं म्हटलं जातं. म्हणजे लाखो वर्षांपूर्वी जुन्या वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष जमिनीखाली दाबले जाऊन तयार झालेले इंधन. साधारण ३० ते ४० कोटी वर्षांआधी प्लँकटनसारखे सूक्ष्म जीव आणि समुद्री वनस्पती नष्ट झाल्या. हे समुद्राच्या तळाशी जमा झाले. काळानुसार त्यांवर चिखल, वाळूचा थर जमा झाला.
जसजसा या अवशेषांवर वेगवेगळ्या गोष्टींचा थर वाढत गेला, दबाव अधिक वाढत गेला. यात पृथ्वीच्या आतील उष्णतेने देखील महत्वाची भूमिका बजावली. ऑक्सीजन नसल्याने उष्णता आणि दबावामुळे हळूहळू दबलेले जैविक पदार्थ हायड्रोकार्बनमध्ये रूपांतरित झाले. मग यापासून तयार झालं कच्चं तेल. पण ही प्रक्रिया काय सहज होत नाही. यासाठी लाखो वर्ष लागतात. हेच कारण आहे की, एकदा वापरल्यानंतर तेल पुन्हा लवकर तयार केलं जाऊ शकत नाही.
काही ठिकाणांवरच का आढळतं तेल?
१) आपल्याला माहीत असेल की, तेल पृथ्वीवर सगळीकडे सापडत नाही. काही मोजक्याच ठिकाणांवर तेल सापडतं. मुळात तेल तयार होणं हे तीन भूवैज्ञानिक स्थितींवर अवलंबून असतं. पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी असे दगड असले पाहिजे, ज्यात जैविक पदार्थांचं प्रमाण अधिक असेल. जर ते नसतील तर तेल अजिबात तयार होणार नाही.
२) दुसरी गोष्टी म्हणजे जिथे तेल असतं तिथे जमिनीखाली जाळ्यासारखी संरचना असते. तेल हे पाण्यापेक्षा हलकं असतं, त्यामुळे ते नॅचरली दगडांमधून वरच्या दिशेने येतं. ते खाली तळात जाण्यापासून रोखण्यासाठी देखील दगडांचा असा थर हवा जो पाण्यालाही बाहेर येऊ देणार नाही.
३) तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या भागाचा इतिहास. म्हणजे आधी तिथे महासागर असल्याचा इतिहास हवा. आज ज्या ज्या ठिकाणी तेल आढळतं म्हणजे मध्य पूर्वेतील बरेच देश हे पूर्वी समुद्राने झाकलेले होते. पुढे टेक्टॉनिक हालचालींमुळे येथील भूभाग बदलला आणि वाळवंट झाला.
जमिनीखाली कसं जमा होतं तेल?
इथे समजून घेण्याचा मुद्दा असा आहे की, तयार झाल्यानंतर तेल एकाच जागी थांबत नाही. ते हळूहळू जमिनीखालील दगडांमधून वाहत राहतं, जोपर्यंत ते जमिनीखालील भांडारात पोहोचत नाही. म्हणजे तेल जमिनीखाली एका नॅचरल टाकीमध्ये जमा होतं.
कुठे कुठे तेल?
जगभरात व्हेनेजुएला, सौदी अरेबिया, रशिया आणि इराकसारख्या देशांकडे तेलांचा सगळ्यात मोठा भांडार आहे. भारतात तेल राजस्थानच्या बाडमेर, गुजरातच्या खंभात, मुंबई हाय, आसाममध्ये डिगबोई आणि कृष्णा गोदावरी बेसिनसारख्या भागांमध्ये आढळतं.