नाद खुळा! ना घोडा, ना कार थेट JCB वरून नवरदेव घेऊन आला वरात; एका लग्नाची भन्नाट गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 11:40 IST2022-01-25T10:46:35+5:302022-01-25T11:40:52+5:30
एका तरुणाने थेट JCB वरून वरात आणल्याची घटना आता समोर आली आहे.

नाद खुळा! ना घोडा, ना कार थेट JCB वरून नवरदेव घेऊन आला वरात; एका लग्नाची भन्नाट गोष्ट
नवी दिल्ली - लग्न म्हटलं की सर्वांच्याच घरात आनंदाचं वातावरण असतं. प्रामुख्याने नवरदेव हा लग्नासाठी घोडा किंवा एखाद्या अलिशान गाडीमधून लग्नमंडपात येतो. पण तुम्हाला जर कोणी नवरदेव चक्क JCB वरून वरात घेऊन आल्याचं सांगितलं. तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एका तरुणाने थेट JCB वरून वरात आणल्याची घटना आता समोर आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये ही भन्नाट घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमधील सिरमौरमध्ये एक नवरदेव जेसीबी घेऊन गेला. कारण रस्त्यावर मोठा प्रमाणात बर्फ साचलेला होता. जवळपास तीन फुटांपर्यंत बर्फ होता. संगहाडहून रतवा गावासाठी वरात निघाली होती. त्याच वेळी बर्फवृष्टी सुरू झाली. त्यामुळे वरातीला लग्नाच्या स्थळी पोहोचण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यात रस्तेदेखील बंद झाले होते. पुढे जाणे अशक्य होते. त्यामुळे नवरदेवाचे वडील जगत सिंहने पुढे जाण्यासाठी जेसीबी मशीनची सोय केली.
नवरदेव विजय प्रकाश, भाऊ सुरेंद्र, वडील जगत सिंह, फोटोग्राफर यांना बसवून जेसीबीने तब्बल 30 किमीपर्यंत प्रवास केला. लग्नाच्या सर्व विधी केल्या आणि नवरीला जेसीबीमध्ये घेऊन परतले. गिरीपार भागातील गत्ताधार गावात पाऊस आणि हिमवर्षावामुळे रस्ते बंद झाले होते. त्यामुळे कार घेऊन रस्त्याने प्रवास करणे धोक्याचे होते. त्यामुळे नवरदेवाच्या वडिलांनी जेसीबीची व्यवस्था केली.
नवरदेवासह त्याचे वडील, भाऊ, मामा वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचले. मुहूर्ताची वेळही निघून गेली होती. मात्र बर्फमुळे कुटुंबीयांसमोर काहीच दुसरा पर्याय नव्हता. शेवटी वऱ्हाडी मंडळी अशा प्रकारे नवरीच्या घरी पोहोचले. येथे लग्न सोहळ झाल्यावर नवरीला घेऊन ते जेसीबीनेच घरी परतले. सध्या याच लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.