चपाती उशीरा मिळाल्यानं भडकला नवरदेव, मंडपातून फरार होऊन दुसऱ्या तरूणीशी केलं लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 11:32 IST2024-12-28T11:31:40+5:302024-12-28T11:32:45+5:30
येथील एका गावात वरातीला जेवण उशीरानं दिल्यानं नवरदेव भडकला. नवरदेव इतका भडकला की, त्यानं लग्न करण्यासच नकार दिला.

चपाती उशीरा मिळाल्यानं भडकला नवरदेव, मंडपातून फरार होऊन दुसऱ्या तरूणीशी केलं लग्न!
लग्नासंबंधी अनेक घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. कधी एखाद्या लग्नात जेवण कमी पडतं, तर कधी नवरदेव किंवा नवरी पळून जातात. इतकंच नाही तर अनेक छोट्या छोट्या गोष्टींवरूनही लग्न मोडलं जातं. उत्तर प्रदेशच्या मुगलसराय येथील एका गावात वरातीला जेवण उशीरानं दिल्यानं नवरदेव भडकला. नवरदेव इतका भडकला की, त्यानं लग्न करण्यासच नकार दिला.
मुगलसरायमधील एका लग्नात नवरदेवाकडील पाहुण्यांना जेवण देण्यास थोडा उशीर झाला. त्यामुळे नवरदेव आणि त्याचे नातेवाईक नाराज झाले. हा वाद इतका वाढला की, नवरदेव लग्नातून फरार झाला. नवरी नवरदेवाची वाट बघत बसली.
मीडिया रिपोर्टनुसार, सात महिन्यांआधी नवरीच्या गावातीलच मेहताब नावाच्या तरूणासोबत लग्न ठरकलं होतं. २२ डिसेंबरला जल्लोषात लग्न सुरू होतं. नवरीकडील लोकांनी पाहुण्यांचं जोरदार स्वागत केलं. त्यानंतर पाहुण्यांना जेवण देण्यात आलं. तेव्हाच एका पाहुण्याने जेवताना चपाती देण्यास उशीर झाल्याचं सांगत बडबड सुरू केली.
या गोष्टीवरून नवरदेवाकडील लोक नाराज झाले. वाद मिटवण्याचा प्रयत्नही झाला. पण नवरदेवाकडील लोकांनी वरात परत नेण्याचा निर्णय घेतला. नवरीच्या घरातील आनंदावर पाणी फेरलं गेलं. इतकंच नाही तर काही तासांनंतर तरूणाचं लग्न त्याच्या एका नातेवाईकाच्या मुलीसोबत लावून देण्यात आलं. नवरीकडील लोकांना हे समजताच त्यांनी मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली. पण काहीच कारवाई करण्यात आली नाही.
लग्नात ७ लाख रूपयांचं नुकसान
तक्रारीत सांगण्यात आलं की, २०० पाहुणे त्यांच्या घरी आले होते. पाहुण्यांचं रितीरिवाजानुसार स्वागत करण्यात आलं आणि निकाहची तयारी झाली होती. तेव्हाच नवरदेवाकडील लोक जेवण उशीरा मिळाल्यानं रागावले. त्यानंतर ते वरात परत घेऊन गेले. नवरीनं हेही सांगितलं की, दीड लाख रूपये हुंडा मुलाच्या घरी पाठवण्यात आला होता. लग्नात जवळपास ७ लाख रूपयांचं नुकसान झालं.