४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 18:12 IST2025-10-23T18:11:23+5:302025-10-23T18:12:33+5:30
Farmer Buy A Scooty With 40,000 Rupees coins: छत्तीसगडमधील एक शेतकरी चक्क ४० हजार रुपयांची नाणी घेऊन दुचाकी खरेदी करण्यासाठी आला. त्याने दुचाकी खरेदी करण्यासाठी आणलेल्या नाण्यांचा ढीग पाहून शोरूममधील कर्मचारी अवाक् झाले.

४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
दिवाळीच्या सणानिमित्त देशभरात विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. कुणी सोनंनाणं, कुणी घरगुती वस्तू, तर कुणी दुचाकी चारचाकी वाहनं अशी काही ना काही खरेदी करत आहेत. यातील कुणी रोखीने, तर कुणी कर्ज काडून खरेदी करत आहेत. दरम्यान, छत्तीसगडमधील एक शेतकरी चक्क ४० हजार रुपयांची नाणी घेऊन दुचाकी खरेदी करण्यासाठी आला. त्याने दुचाकी खरेदी करण्यासाठी आणलेल्या नाण्यांचा ढीग पाहून शोरूममधील कर्मचारी अवाक् झाले.
दुचाकी खरेदी करण्यासाठी या शेतकऱ्याने १० आणि २० रुपयांची नाणी आणली होती. त्यांचं मूल्य सुमारे ४० हजार एवढं होतं. गेल्या सहा महिन्यांपासून खूप परिश्रम आणि बचत करून ही रक्कम जमवल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. मात्र शेतकऱ्याने आणलेली नाणी मोजताना शोरूममधील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. या शेतकऱ्याने दुचाकीची उर्वरित रक्कम मात्र रोख नोटा देऊन भरली.
या शेतकऱ्याचा साधेपणा आणि त्याने दुचाकी खरेदी करण्यासाठी घेतलेलं कष्ट पाहून शोरूमचे मालक आनंद गुप्ता हेदेखील प्रभावित झाले. त्यांनी शेतकऱ्याने मेहनतीने आणलेली नाणी स्वीकारली. एवढंच नाही तर या शेतकऱ्याला त्याने खरेदी केलेल्या स्कूटीसोबत एक छोटीशी भेटवस्तूही दिली. आता या घटनेची एकच चर्चा परिसरात सुरू आहे.