"आम्हाला खेळायला आवडतं, पण आता..."; चिमुकल्यांचं थेट खासदारांना पत्र, केली 'ही' खास विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:22 IST2025-07-24T18:21:47+5:302025-07-24T18:22:29+5:30
लहान मुलांच्या एका ग्रुपने काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांना पत्र लिहिलं आहे.

"आम्हाला खेळायला आवडतं, पण आता..."; चिमुकल्यांचं थेट खासदारांना पत्र, केली 'ही' खास विनंती
उत्तर प्रदेशातील अलीगडमधील मसूदाबाद कॉलनीतील लहान मुलांच्या एका ग्रुपने काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांना पत्र लिहून त्यांच्या स्थानिक खेळाच्या मैदानाची स्वच्छता करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या परिसरातील एकमेव खेळाच्या मैदानाची बिकट अवस्था दर्शविणारे हे पत्र इन्स्टाग्रामवर शेअर होताच जोरदार व्हायरल झालं आहे.
मसूद यांचा भाचा काझी हमजा मसूदने सोशल मीडियावर शेअर केलेलं हे पत्र "सर्वात गोड अॅप्लिकेशन" असल्याचं म्हटलं गेलं आहे. यामध्ये इम्रान मसूद यांच्या मालकीचा मोकळा प्लॉट वाढलेलं गवत, विखुरलेला कचरा आणि सापांमुळे कसा असुरक्षित झाला आहे याचं वर्णन करण्यात आलं आहे.
मुलांनी सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करताना "आम्ही (मसूदाबाद कॉलनी) मुलं, तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे पत्र लिहित आहोत. आमच्या परिसरात एक प्लॉट आहे, जो तुमचा आहे हे आम्हाला समजलं आहे. आम्ही अनेकदा या मैदानात खेळतो कारण जवळपास दुसरं कोणतंही मोकळे मैदान नाही. हे एकमेव ठिकाण आहे जिथे आम्ही एकत्र खेळू शकतो. अलिकडे जंगली झाडं, कचरा आणि वाढलेल्या गवतामुळे मैदान घाणेरडे आणि असुरक्षित झालं आहे."
"आम्हाला दोन साप देखील दिसले आहेत, ज्यामुळे आम्हाला आणि आमच्या पालकांना खूप काळजी वाटते. आम्हाला तिथे खेळायला आवडतं, पण आता ते धोकादायक वाटत आहे" असं म्हटलं आहे. इन्स्टाग्राम युजर्सनी ही पोस्ट लाईक केली. तसेच त्यांनी मुलांच्या प्रयत्नांचं भरभरून कौतुक केलं. "आम्हाला खात्री आहे की खासदार साहेब या मुलांच्या मागण्यांवर लवकरात लवकर काम करतील" असं काही लोकांनी म्हटलं आहे.