पाण्याखाली 29 मिनिटे श्वास रोखून विश्वविक्रमाला गवसणी; वैद्यकीय संशोधनाला मिळणार नवी दिशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:07 IST2025-11-12T16:06:34+5:302025-11-12T16:07:54+5:30
विटोमिर मारिसिक यांनी पाण्याखाली 29 मिनिटे 3 सेकंद श्वास रोखून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे.

पाण्याखाली 29 मिनिटे श्वास रोखून विश्वविक्रमाला गवसणी; वैद्यकीय संशोधनाला मिळणार नवी दिशा
क्रोएशियाच्या 40 वर्षीय फ्रीडायव्हर विटोमिर मारिसिक (Vitomir Maričić) यांनी पाण्याखाली तब्बल 29 मिनिटे आणि 3 सेकंद श्वास रोखून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. हा विक्रम मागील जागतिक विक्रमापेक्षा जवळपास 5 मिनिटे अधिक आहे. या विक्रमानंतर मारिसिक यांना थोडा पोटदुखी आणि डोकेदुखीचा त्रास झाला, पण काही तासांत ते पूर्णपणे बरे झाले.
वेदना आणि जिद्दीची लढत
हा चमत्कार ओपाटिजा शहरातील एका हॉटेलच्या छोट्या पूलमध्ये घडला. प्रयत्न सुरू करण्यापूर्वी मारिसिक यांनी सुमारे 10 मिनिटे शुद्ध ऑक्सिजनने श्वास घेतला, ज्यामुळे त्यांच्या रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढले. यानंतर ते पूलमध्ये उतरले आणि पूर्णपणे स्थिर राहिले. त्यांच्या शरीराने अनेकवेळा झटके दिले, मात्र त्यांनी हार मानली नाही. 29 मिनिटे आणि 3 सेकंद पाण्याखाली राहून त्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली.
वैद्यकीय क्षेत्रात नवी दिशा
मारिसिक पाण्यबाहेर येताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांचा हा विक्रम मागील विक्रमापेक्षा 4 मिनिटे 58 सेकंदांनी जास्त होता. या विक्रमाच्या वेळी उपस्थित असलेले हायपरबॅरिक मेडिसिनचे तज्ज्ञ डॉ. इगोर बार्कोविच म्हणाले, मानवी शरीर एवढ्या काळ ऑक्सिजनशिवाय राहू शकते, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. या प्रयोगामुळे फुफ्फुस आणि श्वसनसंबंधी आजारांच्या उपचारांमध्ये नवी दिशा मिळू शकते.
मारिकिस यांचे पुढचे ध्येय
विक्रम मोडल्यानंतर आता त्यांचे पुढचे ध्येय रशियाच्या अलेक्सी मोलचानोव (Alexey Molchanov) यांनी केलेल्या 156 मीटर खोल डुबकीचा विक्रम मोडणे आहे. मारिसिक आता 160 मीटरची खोली गाठण्याचे लक्ष्य ठेवत आहेत.