जगातील एक असं गाव जिथे प्रेम करण्यावर आहे बंदी, लग्न न करता सोबत रहाल तर भरावा लागतो दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:53 IST2025-12-27T12:53:15+5:302025-12-27T12:53:50+5:30
Viral News : गावाचे नियम इतके कठोर असल्याचे सांगितले जात आहे की अनेकांना ते खासगी आयुष्यातील हस्तक्षेप वाटत आहेत. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की एखाद्या गावाला लोकांच्या नातेसंबंधांवर आणि वैयक्तिक निर्णयांवर दंड लावण्याचा अधिकार आहे का?

जगातील एक असं गाव जिथे प्रेम करण्यावर आहे बंदी, लग्न न करता सोबत रहाल तर भरावा लागतो दंड
Viral News : जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील कायदे, कठोर नियम नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. जगात विचित्र कायदे आणि नियमांची कमतरता नाही, पण चीनमधील एका छोट्या गावातून समोर आलेल्या या घटनेने सगळ्यांनाच धक्का दिला आहे. येथे प्रेम करणं, लग्नाशिवाय एकत्र राहणं आणि अगदी लग्नानंतर लगेच मूल होणे यावरही दंड आकारला जात होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका नोटिशीमुळे हे गाव चर्चेत आलं. गावाचे नियम इतके कठोर असल्याचे सांगितले जात आहे की अनेकांना ते खासगी आयुष्यातील हस्तक्षेप वाटत आहेत. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की एखाद्या गावाला लोकांच्या नातेसंबंधांवर आणि वैयक्तिक निर्णयांवर दंड लावण्याचा अधिकार आहे का?
हे प्रकरण चीनच्या दक्षिण-पश्चिम युन्नान प्रांतातील लिंखांग गावातील आहे. गावात लावलेल्या एका नोटिशीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्या पोस्टरवर “गावाचे नियम – सर्वांसाठी समान” असे लिहिले होते. ही नोटीस समोर येताच लोकांमध्ये नाराजी पसरली. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, या नोटिशीत लग्न, गर्भधारणा आणि वैयक्तिक वर्तनासंबंधी विविध प्रकारच्या दंडांचा उल्लेख होता. अनेक नेटिझन्सनी याला वैयक्तिक स्वातंत्र्यावरचा हल्ला असल्याचे म्हटले.
लग्नाशिवाय एकत्र राहणे आणि गर्भधारणेवर दंड
नोटिशीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने युन्नान प्रांताबाहेर लग्न केले, तर त्याच्यावर 1,500 युआनचा दंड आकारला जाणार होता. लग्नाआधी गर्भवती झालेल्या महिलांकडून 3,000 युआन वसूल केले जाणार होते. एवढेच नाही, तर लग्न न करता एकत्र राहणाऱ्या कपल्सना दरवर्षी 500 युआन दंड भरावा लागणार होता. नियम इथेच थांबत नव्हते. लग्नानंतर 10 महिन्यांच्या आत मूल झाले, तर पालकांवर 3,000 युआनचा दंड ठरवण्यात आला होता. या नियमांनी अनेकांना हैराण करून सोडले.
भांडण, दारू आणि अफवांवरही कडक कारवाई
गावाचे नियम फक्त नातेसंबंधांपुरते मर्यादित नव्हते. नोटिशीत असेही नमूद होते की पती-पत्नी किंवा कोणत्याही कपलमधील भांडण सोडवण्यासाठी जर गावातील अधिकाऱ्यांना बोलवावे लागले, तर दोघांकडून प्रत्येकी 500 युआन वसूल केले जातील. दारूच्या नशेत गोंधळ घालणे किंवा गावात अशांतता पसरवणे यासाठी 3,000 ते 5,000 युआनपर्यंत दंड ठरवण्यात आला होता. तसेच अफवा पसरवणे किंवा पुराव्याविना आरोप करणाऱ्यांवर 500 ते 1,000 युआन दंड आकारला जाणार होता.
सरकारने नोटीस हटवली
या संपूर्ण प्रकरणावर आता स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप केला आहे. 16 डिसेंबर रोजी मेंगडिंग टाउन सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ही नोटीस “खूपच असामान्य” होती आणि ती हटवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ही नोटीस गाव समितीने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता स्वतःहून लावली होती. मात्र, नोटीस हटवण्यात आल्यानंतरही असा प्रश्न कायम आहे की असे नियम बनवणे योग्य आहे का. हा मुद्दा आता केवळ चीनपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण जगात वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक नियंत्रण यावर चर्चा घडवून आणत आहे.