एका डोसने कँसर नाहीसा होणार; जपानी बेडकात आढळला अँटीकॅन्सर ड्रग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:24 IST2025-12-26T17:23:41+5:302025-12-26T17:24:09+5:30
कर्करोगाच्या उपचारांमध्ये क्रांती घडवू शकणारी एक महत्त्वाचा वैज्ञानिक शोध समोर आला आहे.

एका डोसने कँसर नाहीसा होणार; जपानी बेडकात आढळला अँटीकॅन्सर ड्रग
Cancer Treatment: कर्करोगाच्या उपचारांमध्ये क्रांती घडवू शकणारी एक महत्त्वाचा वैज्ञानिक शोध समोर आला आहे. जपानी ट्री फ्रॉग (Dryophytes japonicus) या बेडकाच्या आतड्यात आढळणाऱ्या एका विशिष्ट बॅक्टेरियाने कर्करोगाविरुद्ध आश्चर्यकारक परिणाम दाखवले आहेत. उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये फक्त एका डोसने ट्युमर पूर्णपणे नष्ट झाले, तेही कोणतेही गंभीर साइड इफेक्ट्स न दिसता. या संशोधनामुळे कर्करोगाच्या नव्या उपचारांची मोठी आशा निर्माण झाली आहे.
कसा लागला हा महत्त्वाचा शोध?
बेडुक, पाल, न्यूट यांसारखे उभयचर आणि सरीसृप प्राणी तुलनेने कर्करोगाने फारसे बाधित होत नाहीत. यामागे त्यांच्या आतड्यातील सूक्ष्मजीव (गट बॅक्टेरिया) कारणीभूत असू शकतात, असा अंदाज जपान अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी येथील वैज्ञानिकांनी व्यक्त केला.
या अभ्यासात संशोधकांनी बेडुक, न्यूट आणि पाल यांच्याकडून 45 वेगवेगळे बॅक्टेरिया निवडले. यापैकी 9 बॅक्टेरियांनी कर्करोगविरोधी प्रभाव दाखवला, तर सर्वात प्रभावी जपानी बेडकाच्या आतड्यातील Ewingella americana हा बॅक्टेरिया ठरला.
या बॅक्टेरियाने काय कमाल केली?
एका डोसनेच उंदरांमधील ट्युमर पूर्णपणे नष्ट झाले.
30 दिवसांनंतर पुन्हा कर्करोग पेशी दिल्यानंतरही पुढील एका महिन्यात ट्युमर तयार झाले नाहीत.
हा बॅक्टेरिया दोन प्रकारे कार्य करतो
थेट ट्युमरवर हल्ला करतो.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (इम्यून सिस्टिम) मजबूत करतो; टी-सेल्स, बी-सेल्स आणि न्यूट्रोफिल्स सक्रिय करतो.
विशेष म्हणजे, ट्युमरमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते, त्यामुळे केमोथेरपी अनेकदा कमी परिणामकारक ठरते. मात्र हा बॅक्टेरिया कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणातही प्रभावीपणे काम करतो.
सुरक्षिततेबाबत काय सांगतात अभ्यास?
उंदरांच्या शरीरातून हा बॅक्टेरिया लवकर नष्ट झाला.
सध्या वापरात असलेल्या डॉक्सोरूबिसिन या केमोथेरपी औषधापेक्षा तो अधिक प्रभावी ठरला.
कोणतेही दीर्घकालीन दुष्परिणाम दिसून आले नाहीत.
निरोगी अवयवांवरही नकारात्मक परिणाम झाला नाही.
संशोधकांच्या मते, योग्य काळजी घेतल्यास हा बॅक्टेरिया क्लिनिकल ट्रायलसाठी सुरक्षित पर्याय ठरू शकतो.
अजून सुरुवातीचा टप्पा
हा अभ्यास सध्या फक्त उंदरांवर करण्यात आला आहे. मानवांवर तो तितकाच परिणामकारक ठरेल का, यासाठी अजून अनेक टप्प्यांतील चाचण्या आवश्यक आहेत. वैज्ञानिक आता हा बॅक्टेरिया इतर कर्करोग प्रकारांवर वापरून पाहण्याचा, तसेच इतर औषधांसोबत एकत्रित उपचारांचा अभ्यास करण्याचा विचार करत आहेत.