या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 18:12 IST2024-09-22T18:11:04+5:302024-09-22T18:12:24+5:30
Cameron Airpark Town: या गावातील प्रत्येक घरासमोर कार-बाईक नाही, तर विमान पार्क केलेले असते.

या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
Cameron Airpark Town: घराबाहेर कार आणि बाईक पार्क करणे एक सामान्य गोष्ट आहे. एखाद्याच्या घराबाहेर किती महाग कार आहे, त्यावरुन त्याच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाजा येतो. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका गावाबद्दल सांगणार आहोत, ज्यात प्रत्येक घरासमोर कार किंवा बाइक नाही, तर चक्क विमान पार्क केलेले असतात. या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे खाजगी जेट आहे. विशेष म्हणजे, हे लोक चहापत्ती आणि दुधासारख्या दैनंदिन वस्तू आणण्यासाठी विमानाचा वापर करतात.
प्रत्येक घरात खाजगी जेट
अमेरिकेतील, कॅलिफेर्नियाच्या एल डोराडो काउंटी येथील कॅमेरॉन एअर पार्क नावाचे गाव विमान वाहतुकीसाठी अतिशय खास गाव आहे. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे खाजगी जेट आहे. गावात सुमारे 124 घरे आहेत. प्रत्येक घरासमोर स्वतःचे खाजगी जेट पार्क केलेले असते. तुम्ही विचार करत असाल की, गावातील लोक इतके श्रीमंत आहेत की, ते कार किंवा बाईकऐवजी जेट वापरतात, तर तसे नाही.
पायलटचे गाव
या गावाची स्थापना 1963 साली झाली. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेतील वैमानिकांची संख्या लक्षणीय वाढली होती. युद्धासाठी अनेक विमानतळ बांधले गेले. युद्ध संपल्यानंतर ते बंद झाले नाहीत. सरकारने ही एअरफील्ड्स निवासी एअर पार्क म्हणून सोडली. नंतर सरकारने या भागात निवृत्त वैमानिकांना राहण्याची व्यवस्था केली. कॅलिफोर्नियातील कॅमेरॉन एअर पार्क हे असेच एक एअरफिल्ड आहे, जिथे प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे खाजगी जेट आहे.
लोक स्वतः विमाने उडवतात
या गावातील बहुतांश लोक निवृत्त वैमानिक आहेत, त्यामुळे ते स्वतःची विमाने देखील उडवतात. हे एअरफील्ड असल्याने रस्तेही अशाच पद्धतीने बांधण्यात आले आहेत. लोकांच्या घरात गॅरेजऐवजी हँगर्स आहेत. येथील रुंद रस्ते धावपट्टीसारखे काम करतात. कॅमेरून एअरपार्कच्या रस्त्यांवर लावण्यात आलेले साइन बोर्ड आणि लेटरबॉक्सही खाली उतरवण्यात आले आहेत, जेणेकरून विमान उड्डाण करताना कोणतीही अडचण येऊ नये. या गावाची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.