१२१ वर्षांपूर्वी एका इंग्रजाने केली होती झाडाला अटक, आजही हे झाड आहे कैदेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 14:24 IST2019-10-30T14:15:15+5:302019-10-30T14:24:49+5:30
जेव्हाही आपण स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आठवतो तेव्हा इंग्रजांकडून करण्यात आलेले अत्याचार ऐकून अंगावर शहारे येतात.

१२१ वर्षांपूर्वी एका इंग्रजाने केली होती झाडाला अटक, आजही हे झाड आहे कैदेत!
जेव्हाही आपण स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आठवतो तेव्हा इंग्रजांकडून करण्यात आलेले अत्याचार ऐकून अंगावर शहारे येतात. कित्येक लोकांना इंग्रजांनी तुरूंगात टाकलं आणि कित्येकांना फासावर लटकवलं. आपल्या इतिहासाच्या पानांवर तुरूंगावासाची शिक्षा मिळाल्याने अनेक उल्लेख आढळतात. पण तुम्ही कधी एका झाडाला अटक केल्याची घटना ऐकली का?
आता तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटेल आणि एका झाडाला अटक कशी केली जाऊ शकते? असा प्रश्नही पडेल. पण ही एक खरी गोष्ट आहे. एक इंग्रज जेलरने नशेच्या स्थितीत एका झाडाला अटक करण्याचा आदेश दिला होता. आणि ते झाड आजही मोठ-मोठ्या साखळ्यांमध्ये कैद आहे.
ही घटना आहे १८९८ मधील, जेव्हा पाकिस्तान भारताचा भाग होता आणि भारत इंग्रजांच्या पिंजऱ्यात कैद होता. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाह येथील लंडी कोटल आर्मी छावणीमध्ये तैनात जेम्स स्क्विड या ब्रिटीश अधिकाऱ्याने भरपूर दारू प्यायली होती. दारूच्या नशेत तो बागेत फिरत होता. अचानक त्याला भास झाला की, एक झाड त्याच्या दिशेने येत आहे आणि तो हल्ला करून त्याचा जीव घेणार आहे.
या अधिकाऱ्याने लगेच दुसऱ्या अधिकाऱ्याला ऑर्डर दिले की, झाडाला लगेच अटक करा. त्यानंतर तैनात सैन्यांनी त्या झाडाला साखळ्यांनी बांधून ठेवलं. नंतर पाकिस्तान वेगळा झाला, पण अजूनही त्या झाडावरील साखळ्या कुणी काढल्या नाहीत. तेथील लोकांचं म्हणणं आहे की, हे झाड इंग्रजांच्या जुलमांचा एक नमुना आहे. हे झाड पाहून लोकांना हे कळतं की, इंग्रजांनी आपल्यावर किती अत्याचार केले होते.
(Image Credit : scoopwhoop.com)
इतकेच नाही तर त्या इंग्रज अधिकाऱ्याने झाडावर एक पाटीही लावली होती आणि त्यावर लिहिले होते की, 'I am Under arrest'. तसेच त्यावर सगळा किस्साही लिहिला आहे. इंग्रज तर गेलेत आणि भारत-पाकिस्तान वेगळे झाले. पण हे झाड आजही इंग्रजांच्या अत्याचाराची आठवण करून देत उभं आहे.