अजबच! 6 हजार वर्ष जुन्या शंखात सापडला मोठा 'खजिना', वैज्ञानिकही झालेत हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:59 IST2025-12-05T13:57:02+5:302025-12-05T13:59:40+5:30
Ancient Shells Found in Spain: संशोधकांच्या मते हे शंख फक्त सजावटीसाठी किंवा अन्न शिजवण्यासाठी नव्हते, तर ट्रम्पेटसारखे वाजवण्यासाठी खास तयार केलेले होते.

अजबच! 6 हजार वर्ष जुन्या शंखात सापडला मोठा 'खजिना', वैज्ञानिकही झालेत हैराण
Ancient Shells Found in Spain: स्पेनमधील कॅटालोनिया प्रदेशात सापडलेल्या 12 विशाल शंखांनी वैज्ञानिकांची उत्सुकता खूप वाढली आहे. हे शंख निओलिथिक वस्त्या आणि प्राचीन खाणींमधून मिळाले असून त्यांचे वय जवळपास 6,000 वर्षे मानले जात आहे. संशोधकांच्या मते हे शंख फक्त सजावटीसाठी किंवा अन्न शिजवण्यासाठी नव्हते, तर ट्रम्पेटसारखे वाजवण्यासाठी खास तयार केलेले होते.
शंखाचा आवाज आधुनिक फ्रेंच हॉर्नसारखा!
बार्सिलोना विद्यापीठातील संशोधक मिकेल लोपेझ गार्सिया लहानपणापासूनच शंखाच्या आवाजाचे चाहते होते. त्यांनी जुने असलेले आठ शंख-ट्रम्पेट तपासून पाहिले आणि त्यांच्यातून निघणारा आवाज खूप शक्तीशाली आणि आधुनिक फ्रेंच हॉर्नसारखा असल्याचे आढळले. याचा अर्थ असा की प्राचीन मानवांनी आधुनिक तंत्रज्ञान नसतानाही दूरवर पोहोचणारा आवाज निर्माण करणारे वाद्य तयार केले होते.
शंख कशासाठी वापरले जात होते?
रिसर्चनुसार हे शंख दोन मोठ्या कारणांसाठी वापरले जात होते. दूरवर राहणाऱ्या समुदायांमध्ये संदेश पोहोचवण्यासाठी, खाणीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये संपर्क ठेवण्यासाठी हे शंख वापरले जात होते.
अनेक शंख खाणींमधील वेगवेगळ्या गॅलरींमध्ये सापडले, ज्यावरून असे दिसते की कामगार कदाचित संकेत देण्यासाठी, दिशा सांगण्यासाठी किंवा इशारा करण्यासाठी हे शंख वापरत असावेत.
शंखांमध्ये संगीत निर्माण करण्याची क्षमताही होती?
लोपेझ आणि त्यांची सहसंशोधक डियाज-अंद्रेउ यांनी या शंखांवर अनेक प्रयोग केले. त्यानुसार शंखात हात घातल्यावर टोन बदलतो. ‘t’ किंवा ‘r’ आवाजासारखी फुंकर मारल्यास साऊंडचा रंग बदलतो. याचा अर्थ हे शंख फक्त संकेत देण्यासाठी नव्हते तर साधे स्वर, अभिव्यक्ती आणि संगीताचे स्वर निर्माण करण्यासही सक्षम होते. संशोधकांच्या मते हे शंख युरोपमधील सर्वात जुन्या ध्वनीतंत्रांपैकी एक असू शकतात.
अशाच प्रकारचा एक शंख फ्रान्सच्या मार्सूलास गुहेत आधी आढळला होता, ज्याचे वय 18,000 वर्षे मानले जाते. यावरून स्पष्ट होते की शंख-ट्रम्पेटचा वापर मानव हजारो वर्षांपासून करत आला आहे, आणि स्पेनमध्ये सापडलेले शंख हीच परंपरा पुढे नेणारे पुरावे आहेत.
मिकेल लोपेझ जे जॅझ, फंक आणि लोकसंगीत वाजवतात. असे म्हणतात की या शंखांनी त्यांना मानव संगीताची सुरुवात नेमकी कशातून झाली याचा विचार करायला लावले. संगीत केवळ गरजेमुळे जन्माला आले का? किंवा ते भावना, प्रेम, नातं, अभिव्यक्ती आणि जोडणीची नैसर्गिक इच्छा म्हणून विकसित झाले? हा प्रश्न आजही मानवजातीसाठी तितकाच रोचक आहे.