विमानात प्रवास करताना सोबत टेनिस बॉल ठेवण्याचा सल्ला का देतात? पाहा काय आहे याचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:46 IST2026-02-27T14:45:21+5:302026-02-27T14:46:17+5:30
Interesting Facts : अनेकदा हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, लांबच्या प्रवासादरम्यान सोबत टेनिस बॉल ठेवावा. पाहा याचं कारण..

विमानात प्रवास करताना सोबत टेनिस बॉल ठेवण्याचा सल्ला का देतात? पाहा काय आहे याचं कारण
Interesting Facts : प्रवास रेल्वेचा असो, बसचा असो किंवा विमानाचा असो लांबचा असेल तर थकवा येणं साहजिक आहे. विमानातून प्रवास करताना अनेकांना कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास होतो. लांबचा प्रवास करताना जास्त वेळ बसून राहिल्याने आणि हालचाल कमी केल्याने ही समस्या होते. अशात जर लांबच्या प्रवासात जवळ टेनिस बॉल ठेवला तर आराम मिळू शकतो. अनेक हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, एका छोट्या टेनिस बॉलच्या मदतीने मान, खांदे आणि पायांचं दुखणं कमी केलं जाऊ शकतं. डॉक्टर सांगतात की, टेनिस बॉल प्रवासादरम्यान पाठीच्या खालच्या भागातील वेदना कमी करण्यास मदत करतो.
कंबरदुखी होईल दूर
प्रवास लांबचा असेल तर असेल मग तो रेल्वेचा असो वा विमानाचा. कंबरेच्या खालच्या भागात वेदना होतात. अशात टेनिस बॉल एका सोप्या प्रेशर टूलसारखा काम करतो. जो जास्त वेळ बसून राहिल्याने टाइट झालेले स्नायू सैल करण्यास मदत करतो.
डॉक्टर सांगतात की, “लांब प्रवासादरम्यान लोक बराच वेळ बसून राहतात, त्यामुळे कंबरेच्या खालच्या भागात आणि आसपास वेदना किंवा ताण जाणवू शकतो.” अशा वेळी कंबरदुखी कमी करण्यासाठी टेनिस बॉलवर बसून कंबर सुमारे एक मिनिट हलक्या गोलाकार हालचालीत फिरवा. यामुळे स्नायूंचा कडकपणा कमी होण्यास मदत होते.
मानदुखीपासूनही मिळू शकतो आराम
फिजिओथेरपिस्ट सांगतात की मान आणि पाठीच्या वरच्या भागात ताण किंवा कडकपणा जाणवत असेल तर पाठीच्या वरच्या भाग आणि सीटच्या मध्ये टेनिस बॉल ठेवावा. हलक्या दाबाने तो हलवल्यास मानदुखी कमी होण्यास मदत होते.
पायांना मिळतो आराम
लांब फ्लाइट किंवा प्रवासात पाय आणि पोटऱ्या कडक व जड वाटू लागतात. अशावेळी पायाखाली टेनिस बॉल फिरवल्यास हलकी हालचाल होते आणि आराम मिळतो. तज्ज्ञांच्या मते, पायाखाली टेनिस बॉल ठेवून तो हलक्या दाबाने पुढे-मागे आणि छोट्या गोलाकार हालचालींमध्ये फिरवल्यास पायांचा कडकपणा कमी होतो आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते.