एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात, नाथाभाऊंनी कार्यकर्त्यांसाठी केलं ट्विट
By महेश गलांडे | Updated: November 1, 2020 19:23 IST2020-11-01T19:20:57+5:302020-11-01T19:23:28+5:30
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे आपल्या वाहनाने जळगावकडे परत येत होते. धरणगाव- जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर त्यांचं वाहन येताच वाहनाचे टायर फुटलं

एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात, नाथाभाऊंनी कार्यकर्त्यांसाठी केलं ट्विट
मुंबई - भाजपा सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती त्यांनी स्वत:च दिली. अमळनेरहून जळगावच्या दिशेने जात असताना खडसेंच्या गाडीला अपघात झाला. खडसे यांच्या धावत्या वाहनाचं टायर फुटलं. वाहनचालकानं प्रसंगावधान राखून वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, खडसेंच्या अपघाताच्या बातमीने कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: एकनाथ खडसेंनी ट्विटरवरुन माहिती दिली.
धरणगाव-जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. मिळालेली माहिती अशी की, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे आपल्या वाहनाने जळगावकडे परत येत होते. धरणगाव- जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर त्यांचं वाहन येताच वाहनाचे टायर फुटलं. वाहन चालकानं प्रसंगावधान राखून क्षणात वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. एकनाथ खडसे सुखरुप असून अपघातग्रस्त वाहन जागेवरच सोडून ते दुसर्या वाहनाने जळगावकडे रवाना झाले आहेत.
आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने आणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 1, 2020
खडसेंचा भाजपाला इशारा
खडसे यांच्या मागे अनेक आमदार, पदाधिकारी, खासदार राष्ट्रवादत जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, खडसे हे राष्ट्रवादीमध्ये गेले तरी भाजपा मधील कोणीही नेते त्यांच्या मागे जाणार नाहीत किंवा त्यांच्या जाण्याने भाजपला ही कोणताही फरक पडणार नाही, अशी वक्तव्ये महाजन, रावसाहेब दानवे यांनी केली होती. यावर खडसे यांनी भविष्यातील राजकीय संघर्षाचे संकेत दिले आहेत. आज कोणताही मोठा बदल दिसणार नसला तरी आगामी काळात मात्र कोणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती सक्षम आहे हे दिसून येईल. पक्षात कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना अशी वक्तव्य करावीच लागतात, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.