मधमाशीच्या विषारी डंखाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; जळगावमधील पहूर येथील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 18:16 IST2023-02-20T18:15:16+5:302023-02-20T18:16:21+5:30
अमजदखॉं पठाण यांचे शेंगोळे रस्त्यावर शेत आहे.

मधमाशीच्या विषारी डंखाने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; जळगावमधील पहूर येथील दुर्दैवी घटना
- मनोज जोशी
जळगाव : मधमाशीने जिभेला चावा घेऊन घशात डंख मारला. यामुळे श्वास घेणे असह्य झाल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास लोंढ्री बुद्रूक ता. जामनेर येथे घडली. अमजद खाँ अस्लम खाँ पठाण(२८, रा. लोंढ्री बुद्रूक ता. जामनेर )असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमजदखॉं पठाण यांचे शेंगोळे रस्त्यावर शेत आहे. सोमवारी सकाळी १० वाजता ते मजुरांसाठी जेवणाचे डबे घेऊन ते दुचाकीने शेतात गेले होते. त्यानंतर घराकडे निघाले होते. वाटेत त्यांच्या जिभेला मधमाशीने चावा घेऊन ती घशात गेली. यामुळे त्यामुळे असह्य वेदना होण्यास सुरुवात झाली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्राथमिक उपचार मिळेपर्यत त्यांचा मृत्यू झाला होता.
त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुले, मुली व भाऊ असा परिवार आहे. लोंढ्री गावात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. पठाण हे पहूर येथील अजमुद्दीन शेख यांचे जावई होत.
डंख करणारी मधमाशी आग्या मोहाळामधील असावी. मधमाशीने घशात डंख मारल्यावर तिथे सूज येते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. मधमाशीचा डंख विषारी असल्याने शरीरातील अवयव निकामी होऊन रक्तचाप कमी होतो. यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांनी शेतात जातांना चेहरा, तोंड, नाक रुमालाने झाकून घ्यावे आणि स्वत:ची काळजी घ्यावी. - डॉ. नजमुद्दीन तडवी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय पहूर, ता.जामनेर.