तुम्हीच सांगा, शेतकऱ्याने जगायचं कसं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 21:57 IST2019-11-06T21:56:47+5:302019-11-06T21:57:25+5:30
वडली येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू : शासन तर कधी निसर्गाच्या चक्रात रोज मरतोय शेतकरी

तुम्हीच सांगा, शेतकऱ्याने जगायचं कसं?
सुनील पाटील ।
जळगाव : आधी कोरडा दुष्काळ, त्यात शेतकरी होरपळला गेला. शासनाने अनेक घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात हाती मदत मिळालीच नाही. यंदा पाऊस चांगला आहे, त्यामुळे उत्पन्न चांगले येईल, ही अपेक्षा असताना पाऊस इतका येईल आणि शेतकºयाला उद्ध्वस्त करुन जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते...सर्वच बाजूने शेतकरी मरतोय...आता तुम्हीच सांगा शेतकºयाने जगायचं कसं असा उद्विग्न सवाल वडली, ता.जळगाव परिसरातील शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
यंदा परतीच्या पावसाने हाहाकार उडविला असून जिल्ह्यातील शेतकºयांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. वडली, म्हसावद, पाथरी, वावडदा, वराड, जळके, सुभाषवाडी व लोणवाडी परिसरात सुरुवातीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. कधी नव्हे इतक्या नद्या व नाले या भागातून ओसांडून वाहू लागले. सर्वच तलाव फुल्ल झाले. थोडाही पाऊस आला तर त्यात थेट पीकेच वाहून जात आहेत.
एक दोन दिवसाची विश्रांती मिळाली व शेतजमीन सुकली की पुन्हा पाऊस येत असल्याने उभी पिके उद्ध्वस्त होत आहेत.
सोयाबीन, कापूस व मका शंभर टक्के उद्ध्वस्त
वडली परिसरातील मुख्य पीक कापूस, कांदा,मका, सोयाबीन व ज्वारी हे आहे. या परतीच्या पावसामुळे हे सर्व पीके शंभर टक्के उद्ध्वस्त झाले आहेत.
कापसाचा केवळ २० टक्के हंगाम बाकी आहे. कापसाच्या कैºया तितक्या शिल्लक आहेत. अशीच स्थिती राहिली तर तेही पीक येणार नाही.
नाल्याकाठच्या विहीरी कोसळल्या
वडली शिवारातील माणिक कृष्णा पाटील, गोकुळ वसंत पाटील, रतिलाल रामकृष्ण पाटील या शेतकºयांच्या नाल्याकाठी असलेल्या विहिरी या पावसामुळे कोसळल्या आहेत.
गुरांच्या किडनीवर परिणाम...या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी व मका सडल्याने त्याचा चाराही शिल्लक नाही. हा चारा गुरांनी खाल्ला तर त्यांच्या किडनीवर परिणाम होण्याचा धोका आहे. त्याशिवाय घटसर्प या आजारालाही निमंत्रण देण्यासारखं आहे. गुरांच्या डॉक्टरांनी शेतकºयांमध्ये जनजागृती करुन हा चारा गुरांना खाऊ घालण्यापासून प्रतिबंध केला आहे. त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळ्यात चाºयाची बिकट समस्या निर्माण झाली आहे.
शेतकºयांना सवलत का नाही?... सरकारी नोकरांना भरमसाठ पगार, पेन्शन, आमदार, खासदारांना पगार, पेन्शन व इतर भत्ते, उद्योजकांना कर सवलत, काही कंपन्यांची कर माफी असा फायदा सरकारकडून या वर्गाला केला जातो, आणि जगाचा पोशिंदा मानल्या जाणाºया शेतकºयाला का कोणती सलवत दिली जात नाही. कर्जमाफी पुरेशी दिली जात नाही. कधी सरकार मारते तर कधी निसर्गच शेतकºयाला मारतो, मग शेतकºयांनी काय करावे असा सवाल अनेक लोटन रामचंद्र पाटील या शेतकºयाने केला.