शिरसोली: येथील हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडविणारी शज्जनहा बाबा दर्ग्याची यात्रा यंदाही कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आली असून यात्रेनिमित्त कुणीही गर्दी करून कोरोनाला निमंत्रण देऊ नये, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
शिरसोलीसह पंचक्रोशीतील हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन घडविणारी शज्जन शहा बाबांची यात्रा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करच्या दिवशी भरत असते. या यात्रेच्या दिवशी हिंदू-मुस्लीम बांधव गावाजवळून ३ किमी. अंतरावर असलेल्या नायगाव शिवारात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या शगज्जन शहा बाबांच्या दर्ग्यावर जाऊन दर्शन घेत असतात. काही भाविक येथे वरण बट्टीचा व गोड भाताचा न्यास देऊन नवस फेडत असतात. दर्ग्याचे मुज्जावर म्हणून कासमशहा बाबा काम पहात असत. या यात्रेनिमित्त मुस्लीम बांधवांकडून गावातून सवाद्य संदल मिरवणूक काढून ती दर्ग्यापर्यंत नेली जाते.
या यात्रेनिमित्त गावात कुस्त्यांची दंगल होत असते. या कुस्त्यांच्या दंगलीत धुळे,नाशिक, औरंगाबाद, इंदूर या सह विविध भागातून पहेलवान येऊन कुस्त्यांचा आखाडा गाजवित असतात. बच्चे कंपनीची करमणूक व्हावी यासाठी मोठमोठे पाळणे व मिठाइची दुकानेही येत असतात. महिला वर्गांसाठी मोठमोठी भांड्यांची दुकानेही थाटलेली असतात. या यात्रेत लाखोंच्या घरात आर्थिक उलाढाल होत असते. करमणुकीसाठी संध्याकाळी तमाशा नाट्य मंडळाचे आयोजनही केले जाते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे येथील यात्रा प्रशासनाकडून रद्द करण्यात आली असून भाविकांसह ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.