चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथे जुगारावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 18:33 IST2019-01-16T18:32:11+5:302019-01-16T18:33:36+5:30
चाळीसगाव , जि.जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथे कुंझर रस्त्यावर एका शेतात पत्र्याच्या शेडजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मेहुणबारे ...

चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथे जुगारावर धाड
चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथे कुंझर रस्त्यावर एका शेतात पत्र्याच्या शेडजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मेहुणबारे पोलिसांनी १५ रोजी रात्री छापा टाकून १४ मोटारसायकलींसह रोख रक्कम असा सुमारे तीन लाख ५६ हजार २४० रूपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी सात जणांना अटक करून त्यांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसत्रामुळे कळमडू परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती अशी की, तालुक्यातील कळमडू येथे कुंझर रस्त्यावर सर्जेराव पाटील यांच्या शेतातजवळ पत्र्याच्या शेडनजीक झुडूपांच्या आडोशाला पत्त्याचा जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक शेख व सहकाऱ्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री छापा टाकला. त्यात १४ मोटारसायकली व रोख रक्कम ६ हजार २४० रुपये असा एकूण ३ लाख ५६ हजार २४० रूपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांचा छापा पडताच काही जण पळून गेले.
याप्रकरणी पोलीस नाईक योगेश मांडोळे यांनी फिर्याद दिली. त्यावरून भागवन भीमराव पाटील, भाऊसाहेब जयराम पाटील, गुलाब सुरेश पाटील, वसंत संतोष ठाकरे, शैलेंद्र संतोष पाटील, भालेराव शिवाजी खैरनार, शिवाजी सीताराम पाटील सर्व रा. कळमडू अशा सात जणांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.