दहावीचा निकाल : यश मिळाले; पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST2021-07-25T04:15:03+5:302021-07-25T04:15:03+5:30

लेखक - कौस्तुभ परांजपे, जळगाव काही गोष्टी त्याच पद्धतीने झाल्यावर त्याचे समाधान वेगळेच असते. त्या पध्दतीने गोष्टी झाल्या नाहीत ...

X result: Success; But | दहावीचा निकाल : यश मिळाले; पण

दहावीचा निकाल : यश मिळाले; पण

लेखक - कौस्तुभ परांजपे, जळगाव

काही गोष्टी त्याच पद्धतीने झाल्यावर त्याचे समाधान वेगळेच असते. त्या पध्दतीने गोष्टी झाल्या नाहीत आणि तरी त्यात यश मिळाल्यावर त्यात आनंद असतो, पण समाधान नसते‌.

दहावीचा तो निकाल लागला आणि एक इतिहास घडला. पण या निकालाबरोबरच अनुभवल्या जाणाऱ्या काही गोष्टी पण या वर्षाकरता संपल्या. दहावीत आहेस ना...... जरा लक्ष दे. या लक्षवेळा दिल्या जाणाऱ्या लक्षवेधी सूचना मुलांना ऐकू आल्या नसतील. मुलांना परीक्षा केंद्रावर घेऊन जाण्याची पालकांची लगबग दिसलीच नाही. पालकांचे चिंताग्रस्त चेहरे, परीक्षा झाल्यावर कसा गेला पेपर? आता थोडावेळ छान आराम करून उद्याच्या पेपरवर लक्ष दे. अशी पाचवीला पुजलेली दहावीच्या परिक्षेची वाक्ये तोंडावरच्या मास्कमागेच दाबली गेली.

ओढून ताणून आणलेला मुलांच्या चेहऱ्यावरचा ताण जाणवला नाही. मुले आत पेपर सोडवतांना सोडायला आलेली पालक मंडळी सावलीच्या आधाराने गंभीरपणे मोकळ्या गप्पा मारताना दिसली नाहीत. इतिहास, भूगोलाच्या पेपरच्या वेळी परीक्षांचा इतिहास, आणि बदललेले

वातावरण यावर त्या भौगोलिक ठिकाणची ऐतिहासिक चर्चा नाही. गणिताच्या पेपरच्या वेळी भरलेल्या भरमसाठ फी ची आकडेमोड नाही. इंग्रजीच्या पेपरच्या वेळी आधुनिकतेच्या मारलेल्या गप्पा नाही. मराठीच्या पेपरला मराठी येणे मस्ट आहे. पण इंग्रजीचा महत्त्वाचे यावर मुक्त संवाद झाले नाहीत.

परीक्षा संपल्यानंतर झालेला आनंद, आणि निकालाच्या दिवशी असलेली अनामिक हुरहुर लक्षात आली नाही. नाही म्हणायला, अजूनही थोडे लक्ष घातले असते तर थोडे जास्त मार्क मिळाले असते. पण बुड टेकत नाही असे म्हणणाऱ्यांना एक नवीन कारण मात्र मिळाले. आता सांगतात थोडे जास्त मिळाले असते, पण नेमका महत्त्वाचा पोर्शन सुरू असतांनाच मेला नेटवर्कचा प्रॉब्लेम यायचा पण नेटवर्क कव्हर नसले तरी

अभ्यास मात्र कव्हर केला याचे कौतुक

अजूनही एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे या परीक्षेच्या वेळी असलेला पोलिस बंदोबस्त, शैक्षणिक मंडळाची भरारी घेत निघणारी भरारी पथके आणि या सगळ्यांच्या हातावर तुरी देत गनिमीकाव्याने कॉपी पुरवणाऱ्या मंडळींचे वर्तमानपत्रात छळकलेले फोटो दिसलेच नाहीत. आणि कोणत्याही प्रकारची कॉपी न होता पास होणाऱ्यांची टक्केवारी मात्र वाढल्याचे दिसले. अशा रितीने न दिलेल्या परीक्षेच्या निकालाची हुरहुर संपली आहे, असे वाटते. अगोदर दहावीत कोण आहे? त्यांना आठवणीने दिलेल्या शुभेच्छा या निकाल लागेपर्यंत लक्षात असायच्या. पण आता मुले दहावीत असल्याचे जाणवलेच नाही.

पेपरला जाण्याअगोदर नमस्कार करायला येणारी मुले निकालाचे पेढे घेऊन आल्यावरच ते दहावीत होते हे समजले.

Web Title: X result: Success; But

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.