कोविडमुळे मोहीम थंडावली : आता दोन दिवस घरोघरी गोळ्या वाटपाचे नियोजन
डमी ११६५
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात कोविडमुळे अन्य नॉनकोविड मोहिमा थंडावल्याचे चित्र आहे. त्यात जिल्ह्यातील १ ते १९ वर्षांपर्यंतच्या मुलांना देण्यात येणाऱ्या जंतनाशक गोळ्या वाटपाच्या मोहिमेवरही यात परिणाम झाला आहे. शाळा, अंगणवाड्या बराच काळ बंद असल्याने हा परिणाम झाला आहे. २८ टक्के बालकांमध्ये हा जंतदोष आढळतो, असा अंदाज असताना ही मोहीम राबविण्याला प्राधान्य दिले जावे, अशीही एक मागणी समोर येत आहे.
२१ आणि २८ सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये आता ज्या शाळा सुरू आहेत, त्या शाळास्तरांवर तसेच घरोघरी आशा व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत. २१ सप्टेंबरच्या मोहिमेत जी बालके यातून सुटली असतील त्या बालकांना २८ सप्टेंबरला या गोळ्या वाटप केल्या जाणार आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. मध्यंतरी घरोघरी हा गोळ्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र, कोविडमुळे तो पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी या गोळ्या वाटप करण्यात आल्याची माहिती आहे.
वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या
१ ते १९ वर्षांपर्यंतच्या मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. यात १ ते ३ वर्षांपर्यंतच्या मुलांना गोळीची पावडर करून तिचे पाणी दिले जाते, तर ३ वर्षांपुढील मुलांना एक गोळी त्यांना चावून खायला सांगितले जाते. ही गोळी गोड असल्याने लहान मुलांना सहज खाता येते. असे माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी सांगितले.
काय आहे जंतदोष?
कृमी या जंतदोषामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर पांढरे चट्टे येत असतात. यासह ॲनेमियाचे प्रमाण वाढते. मुलांची भूक मंदावते, याचाच परिणाम त्याची शारीरिक व मानसिक वाढीवर होत असतो. त्यातून त्याला विविध आजार उद्भवू शकतात. अशा वेळी या गोळ्या दिल्यानंतर जंतदोष होत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप
या गोळ्यांच्या घरोघरी वाटपाची मोहीम ही दरवर्षी जिल्हा आरेाग्य विभागाकडून राबविली जात असते. त्या पार्श्वभूमीवर याबाबत जनजागृतीही केली जाते. गेल्या दीड वर्षापासून ही मोहीम मात्र थंडावली आहे. त्यातच अंगणवाड्या व शाळाही बंदच होत्या. शाळा उघडल्या असल्या तरी अंगणवाडी बंदच आहे. त्याचाही एक परिणाम झाला आहे.
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?
जंतदोषापासून बालकांना दूर ठेवण्यासाठी पालकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. याचा थेट परिणाम बालकाच्या शारीरिक व मानसिक वाढीवर होऊ शकतो. अशा स्थितीत या गोळ्यांची गरज असल्यास आपल्या जवळच्या आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रावर या गोळ्या उपलब्ध असतात, असेही डॉ. वाघ यांनी सांगितले.
कोट
कोविडमुळे शाळा व अंगणवाडी बंद असल्याने मोहिमेवर थोडा परिणाम झाला होता. मात्र, घरोघरी जाऊन या गोळ्या वाटप करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जंतनाशक गोळ्या या जवळच्या आरेाग्य केंद्रातही उपलब्ध असतात. २१ व २८ रोजी या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
- डॉ. समाधान वाघ, माता व बालसंगोपन अधिकारी