सुनेच्या बाळंतपणानंतर घरी निघालेल्या सासूचा एसटीतच मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:45 IST2025-07-25T19:42:29+5:302025-07-25T19:45:16+5:30
नातू झाल्याच्या आनंदात घरी निघालेल्या आजीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

सुनेच्या बाळंतपणानंतर घरी निघालेल्या सासूचा एसटीतच मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का
Jalgaon Shocking News : सुनेच्या प्रसूतीनंतर घरी तोंडापूर येथे परतणाऱ्या ४८ वर्षीय सासूचा बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७:३० वाजता जामनेर नगरपरिषद चौकाजवळ घडली. ही महिला जामनेर येथून तोंडापूर बसने प्रवास करीत होती. सुनीता रामचंद्र चिखले (वय ४८, रा. तोंडापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
सुनीता या सुनेच्या प्रसूतीसाठी जामनेर येथे रुग्णालयात आल्या होत्या. चार दिवसांपूर्वी त्यांच्या सुनेला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुनीता मंगळवार रोजी रात्रभर जामनेर येथे सुनेसोबत होत्या. बुधवारी त्यांनी तोंडापूरला परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मुलाने त्यांना बुधवारी सकाळी जामनेर बसस्थानकावर तोंडापूर बसमध्ये बसवले. बस सुरू झाल्यानंतर काही अंतरावर जामनेर नगरपरिषद चौकात पोहोचताच त्यांच्या छातीत दुखू लागले व त्या बसच्या सीटवर कोसळल्या.
प्रवाशांनी लगेच चालक-वाहकाला सांगून बस थेट उपजिल्हा रुग्णालयात नेली. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिला मृत झाल्याचे जाहीर केले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.