लग्नाआधीच नववधूचा पलायनाचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:51 IST2020-12-14T18:49:47+5:302020-12-14T18:51:11+5:30
एजंटमार्फत जुळलेले लग्न लागण्याच्या आधीच नववधूने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच तिचा हेतू निदर्शनास आल्याने हा सारा डाव फसला.

लग्नाआधीच नववधूचा पलायनाचा प्रयत्न फसला
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : एजंटमार्फत जुळलेले लग्न लागण्याच्या आधीच नववधूने पळून जाण्याचा प्रयत्न केला व लग्न करण्यास नकार दिल्याचा प्रकार तालुक्यातील वडाळा-वडाळी येथे उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या नवरदेव याच्या फिर्यादीवरून मध्यस्थी महिला एजंट, नववधूसह सहाजणांविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथील अंकुश भाऊसाहेब आमले या शेती व्यवसाय करणाऱ्या तरुणाचे लग्न महिला एजंट संगीताबाई बाबुराव पाटील (औरंगाबाद),अशोक कडू चौधरी (कुंभारखेडा, ता. रावेर), संदेश राजेश वाडे (चिखली, जि. बुलढाणा), अकील मामा (चिखली),रेखाबाई (चिखली) (पूर्ण नाव माहीत नाही ), ममता उर्फ रेशमा रफीकखान (शहानगर, औरंगाबाद) व इतर दोन ते तीन अनोळखी इसम यांनी अंकुश आमले याचे लग्न करण्यासाठी मुलगी शोधून लग्न लावून देतो, असे सांगितले.
नंतर संगीताबाई पाटील हिने अंकुश आमले याच्याकडून दिड लाख रुपये घेतले व त्याचा विवाह ममता उर्फ रेशमा रफीकखान हिच्याशी निश्चित केला. १२ डिसेंबर रोजी लग्नाची तारीख ठरली. त्याआधी लग्नासाठी कपडे, सोन्याचे दागिने व लग्नाचा सर्व खर्च नवरदेव मुलाकडे असल्याने नवरी मुलगी ममता ही खरेदीसाठी चाळीसगावला आली होती. लग्नाची लगबग व खरेदी सुरू असताना नवरी मुलगी ममता हिने लग्नाआधीच पळून जाण्याचा प्रयत्न केला व लग्न करण्यास नकार दिला.
याप्रकरणी नवरदेव अंकुश आमले यांच्या फिर्यादीवरून या सर्वाविरुद्ध भादंवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.