विद्यार्थ्यांसाठी व्हेरिफिकेशन, फोटोकॉपी, रिड्रेसल सगळेच ऑनलाइन
By अमित महाबळ | Updated: March 20, 2023 15:35 IST2023-03-20T15:34:57+5:302023-03-20T15:35:25+5:30
पुढील प्रक्रिया अथवा कार्यवाहीची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळवली जाते.

विद्यार्थ्यांसाठी व्हेरिफिकेशन, फोटोकॉपी, रिड्रेसल सगळेच ऑनलाइन
अमित महाबळ
जळगाव : विद्यापीठाच्या परीक्षांच्या निकालानंतर होणारे फोटोकॉपी, व्हेरिफिकेशन, रिड्रेसल आता सगळेच ऑनलाइन करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी ज्यासाठी अडीच ते तीन महिने लागायचे, तीच प्रक्रिया पंधरा ते वीस दिवसांत व्हायला लागली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रथम वर्ष कला, विज्ञान, वाणिज्य, बी. व्होक., बी. एस. डब्ल्यू., आदी अभ्यासक्रम वगळता इतर वर्गांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी (मूल्यमापन) ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे. त्यासाठी विद्यापीठात सुसज्ज कक्ष उभारण्यात आला असून, महाविद्यालयीन स्तरावर तपासणी केंद्रे देण्यात आलेली आहेत. याच बरोबरीने निकालानंतरच्या फोटोकॉपी, व्हेरिफिकेशन, रिड्रेसल या प्रक्रियादेखील ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे. शुल्क ऑनलाइन भरता येते. यानंतरची पुढील प्रक्रिया अथवा कार्यवाहीची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे कळवली जाते.
तुम्हाला अर्ज करायचाय, ही आहे मुदत
- व्हेरिफिकेशन (गुणपडताळणी) - निकाल जाहीर झाल्यापासून २१ दिवसांच्या आत
- फोटोकॉपी (उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत) - निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांच्या आत
- रिड्रेसल (पुनर्मूल्यांकन) - फोटोकॉपी मिळाल्यापासून ८ दिवसांच्या आत.
याआधी असा असायचा वेळखाऊ प्रवास
पूर्वी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये अर्ज करावा लागे. तेथून तो विद्यापीठात येई. त्यानंतर अनेक गठ्ठ्यांमधून नेमकी उत्तरपत्रिका शोधून, झेरॉक्स काढून विद्यार्थ्याला टपालाद्वारे पाठवत. झेरॉक्स मिळाल्यावर विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून मग पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचे. या सर्वांमध्ये दोन ते अडीच महिने लागायचे. या दरम्यान, पुनर्परीक्षेची संधी निघून जायची.
हा झाला बदल
व्हेरिफिकेशनसाठी (गुणपडताळणी) अर्ज केल्यावर निकाल लगेच कळतो. फोटोकॉपी ई-मेलवर येते किंवा डॅश बोर्डवरून डाऊनलोड करून घेता येते. फोटोकॉपीचा अर्ज कोणत्याही दोन विषयांसाठी करता येतो. रिड्रेसलमध्ये (पुनर्मूल्यांकन) दुसऱ्या शिक्षकाकडून उत्तरपत्रिका पुन्हा ऑनलाइन तपासल्या जातात. त्या आधीच स्कॅन केलेल्या असल्याने तत्काळ उपलब्ध होतात. यामध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक बदल झाला असेल तरच सुधारित निकाल कळविला जातो.
हिवाळी परीक्षा २०२२ साठीचे अर्ज
- फोटोकॉपी - ३४१७
- व्हेरिफिकेशन - २६४५
- रिड्रेसल - १७२६
(डिसेंबर २०२२ पासून ते आजअखेरची संख्या)
संचालक म्हणतात...
फोटोकॉपी, व्हेरिफिकेशन, रिड्रेसलच्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे वेळेत बचत होत आहे. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. दीपक दलाल यांनी दिली.