भाचीच्या लग्नाच्या पत्रिका वाटणाऱ्या मामाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:36 IST2020-12-15T18:36:11+5:302020-12-15T18:36:54+5:30
मामाच्या वाहनाला पिकअप या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मामाचा जागीच मृत्यू झाला.

भाचीच्या लग्नाच्या पत्रिका वाटणाऱ्या मामाचा अपघातात मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : भाचीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी मोटारसायकलवरुन जाणाऱ्या मामाच्या वाहनाला पिकअप या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मामाचा जागीच मृत्यू तर सोबत असलेल्या एक जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारांस भोरस शिवारातील गायरानजवळ घडली.
भडगाव तालुक्यातील लहान खेडगांव येथील विजय रघूनाथ केदार (३२) हा भाचीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी विलास रामा निकम (अंतुर्ली, ता. पाचोरा) याच्यासोबत मोटारसायकलवरुन हिरापूर येथे आला होता. हिरापूर येथे नातलगांकडे पत्रिका देवून तो दस्केबर्डीकडे जात असताना भोरस गावाजवळील गायरान शिवाराजवळून जात असताना त्याच्या मोटारसायकलला पिकअप या वाहनाने जोरदार धडक दिली.
या अपघातात विजय केदार यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेल्या विलास निकम हा जबर जखमी झाला आहे. त्यास उपचारार्थ देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अपघातास कारणीभूत ठरणारी वाहन पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास एपीआय धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.