लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडत जात असून, यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता या पुलाचा कामाचा वेग वाढवून डिसेंबर पर्यंत पुलाचे काम पूर्ण करा अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ठेकेदाराला गुरुवारी दिल्या. तसेच अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विद्युत खांब स्थलांतराचे काम देखील महिनाभरात मार्गी लावा अशा सूचनाही त्यानी महावितरण प्रशासनाला केली.
गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शिवाजीनगर उड्डाणपुलाचा बांधकामाची पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत सोनवणे, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्यासह महावितरण व महापालिकेचे अधिकारीदेखील या ठिकाणी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद भागातील व शिवाजीनगर भागातील सुरू असलेले पुलाचा कामाची पाहणी केली. आतापर्यंत पुलाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असले तरी पूलाचा कामाची गती वाढवण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत आता काम थांबवणे किंवा रेंगाळत ठेवणे हे नागरिकांना परवडणारे नसून, डिसेंबर पर्यंत पुलाचे संपूर्ण काम होणे अपेक्षित असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
महावितरणची निविदा प्रक्रिया पूर्ण
गेल्या अनेक महिन्यांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाला लागत असलेले महावितरणचे विद्युत खांब हटवले गेले नसल्याने हे काम रखडले होते. त्यात विद्युत खांब हटवण्याचे काम महावितरण करेल की महापालिका यामध्ये कोणताही निर्णय न झाल्यामुळे हे काम प्रलंबित होते. याबाबत गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हे काम महावितरणचा माध्यमातून करण्याचे आदेश दिल्यानंतर महावितरणने देखील लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढली आहे. त्यामुळे महावितरणकडून देखील महिनाभरात विद्युत खांब हटवण्याचे काम मार्गी लागेल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
जिल्हापरिषद चौकातील मार्ग वाहतुकीला खुला करावा
जिल्हा परिषद जवळून रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता मोटार सायकल व पायी जाणाऱ्यांसाठी खुला करण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. त्यासाठी ज्या ठिकाणी खोदकाम झाले आहे. त्या ठिकाणी भराव टाकण्याचा ही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
महापालिकेची जुनी पाईपलाईन तात्काळ काढावे
शिवाजीनगर कडील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ घेऊन गेलेली जुनी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन काढून ही पाईपलाईन नव्या पाईप लाईन अशी जोडण्याचा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पाईपलाईनचे काम जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत पुलाचे काम देखील सुरू होणार नाही. त्यामुळे महावितरण व महापालिका प्रशासनाने आपली उर्वरित कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. डिसेंबर पर्यंत शिवाजीनगर उड्डाणपुलाचे पूर्ण काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला दिल्या आहेत. त्यानंतर कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही असाही इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.