रेल्वे रुळावर रील बनवताना ट्रेन अंगावरुन गेली; जळगाव जिल्ह्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 15:58 IST2025-10-26T15:57:35+5:302025-10-26T15:58:57+5:30
कानात हेडफोन असल्याने ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही.

रेल्वे रुळावर रील बनवताना ट्रेन अंगावरुन गेली; जळगाव जिल्ह्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
भगवान मराठे/ पथराड (जि. जळगाव) - सोशल मीडियासाठी रील बनवण्याच्या नादात दोन तरुणांचा जीव गेला आहे. ही हृदयद्रावक घटना पथराड (ता. धरणगाव) परिसरात, पाळधी रेल्वे गेटजवळ रविवारी (दि. 26 ऑक्टोबर) सकाळी सुमारास 10 वाजता घडली.
हेडफोनमुळे ट्रेनचा आवाज न ऐकू आल्याने अपघात
मृत तरुणांची नावे हर्षल नन्नवरे आणि प्रशांत खैरनार अशी आहेत. दोघेही 17 ते 18 वयोगटातील असून, ते रेल्वे रुळावर बसून रील शूट करत होते. त्यावेळी दोघांच्या कानात हेडफोन लावलेले असल्याने ट्रेनचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. भुसावळकडे जाणारी अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस तेथून जात असताना, दोघेही तिच्या खाली सापडले आणि जागीच ठार झाले.
पोलिसांचा पंचनामा सुरू
घटनेनंतर धरणगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्यात आला आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भुसावळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
रीलच्या नादात वाढणारे जीवघेणे प्रकार
स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या युगात रील बनवण्याच्या नादात अनेक तरुण जीव धोक्यात घालत आहेत. रेल्वे रुळ, धोकादायक ठिकाणे किंवा चालत्या वाहनांवर स्टंट करताना अपघातांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. या घटनेने स्थानिक परिसरात तसेच संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.