चाळीसगावात एकाच दिवशी दोन खून, तालुका हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 22:12 IST2023-06-08T22:12:33+5:302023-06-08T22:12:41+5:30

देवळी आणि जामडी येथील घटना, वृद्ध व तरुणाचा समावेश

Two murders in one day in Chalisgaon: incidents in Deoli and Jamdi | चाळीसगावात एकाच दिवशी दोन खून, तालुका हादरला

चाळीसगावात एकाच दिवशी दोन खून, तालुका हादरला

संजय सोनार / चाळीसगाव (जि. जळगाव) :चाळीसगाव परिसरात गुरुवारी एकाच दिवशी खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने तालुका हादरला आहे. बुधवारी मध्यरात्री चिंचखेड शिवारात वृद्धाची लाकडी दांडक्याने जोरदार आघात करून निर्घृण हत्या करण्यात आली.  त्यापाठोपाठ जामडी येथे गुरुवारी दुपारी तरुणाचा खून झाला.  राजेंद्र सुकदेव पाटील (५५, रा. देवळी ता. चाळीसगाव) आणि तरबेज शहा याकूब शहा (२५,रा.जामडी ता. चाळीसगाव) अशी या खून झालेल्या इसमांची नावे आहेत. 

बुधवारी रात्री १० वाजता राजेंद्र पाटील हे झोपण्यासाठी शेतात गेले होते. मध्यरात्री अज्ञातांनी त्यांचा गळा दोरीने आवळून मारण्याचा प्रयत्न केला.  तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून ठार मारले. गुरुवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी दोरी व रक्ताने माखलेला लाकडी दांडा आढळून आला. याबाबत माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.  अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहेत. राजेंद्र यांचा मुलगा मुकेश पाटील (२३ रा.देवळी) याने याबाबत फिर्याद दिली. 

तरुण फकिराचा खून 
तालुक्यातील जामडी येथे गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुण फकीर तरबेज शहा याकूब शहा याचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. हा तरुण एका ठिकाणी बसलेला असताना पाठीमागून एकाने धावत येऊन त्याच्यावर सपासप वार केले. यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाला. जामडी येथे गुरुवारी यात्रा होती. त्यामुळे भाविकांची गर्दी होती. त्याचवेळी ही घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. खुनाच्या या दोन घटनांनी तालुका हादरला आहे.

Web Title: Two murders in one day in Chalisgaon: incidents in Deoli and Jamdi