जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:34 IST2025-07-21T11:34:37+5:302025-07-21T11:34:49+5:30
रावेरमधील गावांत जडीबुटी विक्रीसाठी आलेल्या हरयाणातील दोन साधूंना मुले चोरणारे समजून बेदम मारहाण करण्यात आली.

जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
सावदा (जि. जळगाव) : जडीबुटी विक्रीसाठी आलेल्या हरयाणातील दोन साधूंना मुले चोरणारे समजून बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. ही घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा (ता. रावेर) या तीन ठिकाणी घडल्या. या प्रकरणी सावदा पोलिसांत परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस वेळीच पोहोचल्याने पालघर घटनेची पुनरावृत्ती टळली आहे.
मंजुलवाडीमधील घटनेनंतर कारने कुसुंब्याकडे पळाले; तेथेही ग्रामस्थांनी अडवून केली मारहाण, कारची तोडफोड केली. जस्सानाथ पुनुनाथ (वय ६०) आणि मोनुनाथ जस्सानाथ (२०, दोघे रा. सिरसा, हरयाणा) अशी या जखमी साधूंची नावे आहेत. हे साधू रविवारी सकाळी रावेर तालुक्यातील मुंजलवाडी गावात आले. त्यांनी गावात एका व्यक्तीची नाडी तपासणी केली. त्यानंतर तो व्यक्ती घरी गेला आणि काही वेळात इतर लोकांना घेऊन आला. त्यावेळी काही जणांना संशय आला. मुले पळवणाऱ्या टोळीतील असल्याच्या गैरसमजातून लोकांनी या दोन्ही साधूंना मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण होताच या दोन्ही साधूंनी त्यांच्या चारचाकी वाहनातून पळ काढला. ते मंजुलवाडी येथून कुसुंब्याकडे पळाले; पण तिथे पोहोचताच स्थानिक रहिवाशांनी त्यांना अडविले आणि मारहाण करण्यास सुरूवात केली.
या मारहाणीत स्वत:ला वाचवत ते वाहनात कसेबसे बसले आणि लोहारा गावाकडे निघाले. तिकडे जात असताना साधूंच्या कारचा धक्का लागल्याने एकजण जखमी झाला. इथेही लोहारा येथील नागरिकांनी या दोघांना पकडून मारहाण केली, तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली. पोलिस लोहारा येथे घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.
पोलिसांत ३० ते ४० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत सावदा पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. लोहारा ( ता. रावेर) येथील इकबाल तडवी या तरुणाच्या फिर्यादीवरून दोन्ही साधूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तर जस्सानाथ पुनुनाथ यांच्या फिर्यादीवरून ३० ते ४० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या दोन्ही जखमी साधूंवर सावदा रुग्णालयात उपचार करण्यात आले. आणखी मारहाणीचे प्रकार घडू नयेत, यासाठी त्यांना सावदा पोलिस ठाण्यात थांबवण्यात आले आहे.