जळगाव - गणेशमूर्ती खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशातून गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली आहे. दोघांकडून तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
शनिपेठेतील राधेशाम पांडे हे संध्याकाळी ६.३० वाजता जिल्हा परिषदेजवळ थाटलेल्या दुकानांमध्ये गणेशमूर्ती खरेदीसाठी आले होते, त्यावेळी त्यांच्या शर्टाच्या खिशातून अज्ञात चोरट्याने माेबाईल चोरून नेला. हा प्रकार कळताच, त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. त्यावेळी धरणगाव येथील चंद्रकांत पाटील यांचाही मोबाईल चोरट्यांनी लांबविल्याचे त्यांना कळाले. दरम्यान, या दोन्ही घटनांप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. मोबाईल चोरटे हे जिल्हा परिषदेजवळ असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली. चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे नाव विजय गुलाबराव पवार (रा. पिंप्राळ-हुडको) व धर्मेंद्र प्रकाश भावसार (रा. कांचन नगर) असे सांगितले. दोघांकडून तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, त्यांच्याकडून आणखी मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई रतन गीते, संतोष खोले, मनोज पाटील, भास्कर ठाकरे, गणेश पाटील, याेगेश बोरसे, गजानन बडगुजर, बशीर तडवी, किशोर निकुंभ, सचिन वाघ यांनी केली आहे.