कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदाही मिरवणुकांवर बंदी घालून सार्वजनिक मंडळांसाठी चार फूट तर घरगुतीसाठी २ फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, असे असतानाही रिंग रोडवरील एलआयसी कॉलनीतील राजेंद्र राणा यांना सात फूट उंचीची मूर्ती तयार केली.
रथ चौकातील श्रीराम तरुण सांस्कृतिक मित्रमंडळाचे अध्यक्ष जीवन पुंडलिक तायडे व उपाध्यक्ष राहुल दादू मिस्तरी (दोन्ही रा.कोळी पेठ), सराफ बाजारातील साईनाथ तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष भोजराज मानसिंग राजपूत (रा.मारवाडी व्यायाम शाळेजवळ), चेतन दिलीप तिवारी (रा.डेमला कॉलनी), मूर्तिकार राजेंद्र चंदुलाल राणा (रा.रिंग रोड) यांच्याविरुद्ध शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोपनीयचे पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. मूर्तिकार राजेंद्र चंदूलाल राणा (रा.रिंग रोड) यांनी चार फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती बनवून श्रीमंत रामशेठ चौबे परिवार गणेश मंडळ, सागर पार्कसमोर यांना विक्री करून शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल असून, पोलीस कर्मचारी उमेश पाटील यांनी सरकारकडून फिर्याद दिली आहे. पहिल्याच दिवशी बळीराम पेठेतील आझाद क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मूर्तिकाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, शासनाच्या नियमाबाबत पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना, तसेच मूर्तिकारांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली होती, तरीही नियमांचे उल्लंघन झाले.