गौतळा, औट्रामघाट अभयारण्यातून मौल्यवान खडक व वनउपज चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 17:46 IST2021-01-25T17:45:33+5:302021-01-25T17:46:18+5:30
गौताळा औट्राम घाट वन्यजीव अभ्यारण्यात अवैध उत्खनन करून मौल्यवान खडक व वन उपज चोरल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली आहे.

गौतळा, औट्रामघाट अभयारण्यातून मौल्यवान खडक व वनउपज चोरीस
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : गौताळा-औट्रामघाट अभयारण्यास लागून असलेल्या मौजे गराडा, ता. कन्नड जि. औरंगाबाद येथील आरोपी काले खॉ सरदार खाँ, शरीफ सरदार खाँ पठाण, कालू खाँ पठाण, महेबूब खाँ पठाण या चौघांनी गौताळा औट्राम घाट वन्यजीव अभ्यारण्यात अवैध उत्खनन करून मौल्यवान खडक व वन उपज चोरल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. या संशयित आरोपींच्या घरी वन्यजीव विभागाने धाड टाकून विविध वनस्पती जप्त केली आहे. या आरोपींचा शोध घेण्यासाठी जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्ह्याची टीम कामाला लागले आहे.
ही कारवाई वन्यजीव व प्रादेशिक विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या टीमने केली. या कारवाईमध्ये आरोपींच्या घरामध्ये मौल्यवान खडक, सफेद मुसळी व डिंक असा वनांतील वनउपज जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या वनस्पती मुद्देमालाचे वजन केले असता त्यात मौल्यवान दगड–३०१किग्रॅ. सफेद मुसळी–५.१५ किग्रॅ. व धामोडी डिंक–६.८४ किग्रॅ.असा मुद्देमाल व टिकाव, कुदळ, छन्या, टॉमी, करवत इत्यादी साहित्य धाडीच्या कारवाइमध्ये जप्त करण्यात आले आहे.
अभयारण्यात उशिरापर्यंत शोध मोहीम
आरोपी अभ्यारण्यात फरार असल्याच्या माहितीवरून रविवारी रात्री उशिरापर्यंत अभ्यारण्यात संयुक्त शोध मोहीम राबविण्यात येवूनही या वन गुन्ह्यातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. औरंगाबाद वन्यजीव विभागाचे विभागीय वनअधिकारी, विजय सातपुते यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. या कारवाईमध्ये डॉ. राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसंरक्षक पैठण, कन्नड वन्यजीव परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. शेळके, सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) नगद , फिरते पथक औरंगाबाद चे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके हे सहभागी होते.
अभयारण्य क्षेत्रात आरोपींच्या शोध मोहिमेमध्ये शोधमोहिमेत नंदुरबारचे सहायक वन संरक्षक धनंजय पवार, जळगाव जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे (चाळीसगाव), जामनेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांनी सहकार्य केले. या कारवाईत वनपाल संदीप मोरे, विजय ढिघोळे , मनोज उधार, पोपट बर्डे,काटकर, देशमुख, रायसिंग , दारुंटे व वनरक्षक वन मजूर ,पोलीस पाटील व कर्मचारीयांचे सह औरंगाबाद व धुळे वनवृत्तातील अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता. अभयारण्यात अवैध उत्खनन व तस्करीप्रकरणी वन्यजीव विभागाकडून नमुद फरार आरोपी विरोधात वनगुन्हा नोंद केला असून या गुन्ह्याचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. शेळके करीत आहेत.