मुलाची बापाने केली हत्या, नंतर चिठ्ठी लिहून स्वत:ही संंपवलं जीवन
By चुडामण.बोरसे | Updated: February 27, 2025 22:41 IST2025-02-27T22:39:49+5:302025-02-27T22:41:28+5:30
Reel Star Vicky Patil Death: मुलाकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने मुलाचाच गळा आवळून त्याला जीवनातून कायमचे संपवले आणि स्वत:ही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवरून समोर आली आहे.

मुलाची बापाने केली हत्या, नंतर चिठ्ठी लिहून स्वत:ही संंपवलं जीवन
- बी. एस. चौधरी
जळगाव - मुलाकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून माजी सैनिक असलेल्या बापाने मुलाचाच गळा आवळून त्याला जीवनातून कायमचे संपवले आणि स्वत:ही आत्महत्या केली. अंगावर काटा आणणारी ही घटना बापाच्या खिशात आढळलेल्या सुसाईड नोटवरून समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याचा मुलगा रिल्स बनवत होता. गुरुवारी उघडकीस आलेल्या या घटनेने एरंडोल शहर हादरले आहे.
एरंडोलच्या वृंदावन नगरातील रहिवासी आणि माजी सैनिक विठ्ठल पाटील (५०) आणि हितेश पाटील (२२) अशी या मृत बाप-बेट्यांची नावे आहेत. माजी सैनिक विठ्ठल पाटील हे भवरखेडा (ता. एरंडोल) येथील मूळ रहिवासी असून ते आपल्या परिवारासह एरंडोल येथे वृंदावन नगरात वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा हितेश विठ्ठल पाटील हा रिल्स बनवायचा. तो वडिलांपासून वेगळा राहत होता. तो वडिलांना मारहाण करायचा. या प्रकाराला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी आत्महत्या केली. ही घटना एरंडोलमध्ये बुधवारी सायंकाळी घडली होती.
पोलिस तपासात विठ्ठल पाटील यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली. त्यात हितेश हा दारू पिऊन आपणास मारहाण करत होता. त्यामुळे भवरखेडा गावानजीकच्या एका नाल्याजवळ आपण त्याचा खून केला व मृतदेह जमिनीत पुरला आहे, असे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आढळले.
गुरुवारी मुलाचा मृतदेह भवरखेडा येथील नाल्यात आढळून आला. घटनास्थळी सुती दोरी आढळून आली. या दोरीनेच विठ्ठल पाटील यांनी मुलाला फाशी दिली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.