गटाराचे काम करताना विजेचा धक्का बसून सफाई कर्मचारी ठार!
By विजय.सैतवाल | Updated: September 5, 2023 14:49 IST2023-09-05T14:44:27+5:302023-09-05T14:49:19+5:30
याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

गटाराचे काम करताना विजेचा धक्का बसून सफाई कर्मचारी ठार!
जळगाव : गटारीचे काम करीत असताना विद्युत वायरचा धक्का लागल्याने नशिराबाद नगरपंचायतीमधील सफाई कर्मचारी विशाल गोपी चिरावंडे (२६, रा. नशिराबाद) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तालुक्यातील नशिराबाद येथील विशाल चिरावंडे हे गेल्या दोन वर्षांपासून नशिराबाद नगरपंचायतमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला होते. मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता नशिराबाद गावजवळील शेतानजीक गटारीचे काम करीत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.