रात्रीचा प्रवास धोक्याचा : अनेक रस्त्यांवर असतो झुंडींचा ताबा
लोकमत न्यूज नेटवर्क
आनंद सुरवाडे
जळगाव : रात्रीच्या सुमारास शहरातील अनेक रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने ताबा घेतलेला असतो, शिवाय यातील काही कुत्रे हे थेट अंगावर व वाहनांमागे धावत असल्याने रात्रीच्या सुमारास या रस्त्यांवरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. त्यातील बेंडाळे चौकापासून ते नेरी नाका आणि पांझरापोळ गो-शाळेपासून ते एसटी वर्कशॉप या रस्त्यावर या कुत्र्यांची संख्या अधिक आढळून येत असते. महापालिकेने गेल्या दहा दिवसांपासून शहरात आता श्वानांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, दहशत कायम आहे.
कुत्रा चावल्यानंतर शारीरिक व मानसिक अशा दोनही प्रकारचे त्रास जखमीला उद्भवतात. भीतीपोटी मानसिक खच्चीकरण होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियमित उपचार पूर्ववत झाल्यामुळे ही एक चिंता मिटली आहे. अन्यथा केवळ प्रथमोपचार करून अन्य रुग्णालयात पाठविले जात होते. काही गंभीर जखमींना कोविडच्या काळात रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते.
जुलै महिन्याची स्थिती
कुत्र्याचा चावा : ३६६
पुरुष : २२३
महिला : ६१
लहान मुले : ८२
ऑगस्ट महिन्याची स्थिती
कुत्र्याचा चावा : २७०
पुरुष : १६३
महिला : ६२
लहान मुले : ५५
या चौकात जरा सांभाळून
बेडाळे चौकापासून मटन मार्केटजवळ अधिक मोठ्या संख्येने हे कुत्रे रस्त्यावर थांबून असतात. त्यामुळे या ठिकाणाहून पायी जाणे किंवा वाहनावर जाणेही धोकादायक वाटते. जीव मुठीत घेऊन रात्री हा रस्ता पार करावा लागतो. यासह पांझरापोळ गोशाळेपुढील नाल्याजवळही या कुत्र्यांच्या झुंडी असतात. रात्रीच्या सुमारास चौबे शाळेजवळही मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक असते. यासह एमआयडीसी भागातीलही काही रस्त्यांवरही रात्र पाळी संपवून घरी जाणाऱ्यांना या मोकाट कुत्र्यांचा त्रासाला सामोरे जावे लागते.
निर्बिजीकरणास सुरुवात
शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी महापालिकेने दीड कोटी रुपयांचा ठेका नंदुरबार येथील एका संस्थेला दिला आहे. त्यानुसार २७ ऑगस्टपासून शहरातील मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी १५ कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम प्रलंबित होते. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.
वर्षभरात १ ते दीड कोटीचे इंजेक्शन
जिल्हाभरात मोकाट कुत्र्यांच्या चाव्यानंतर देण्यात येणाऱ्या ॲटी रॅबिज व्हॅक्सिन आणि ॲन्टी रेबीज सिरम हे दोन इंजेक्शन वर्षभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अनुक्रमे साडेपाच हजार व १००० असे हे इंजेक्शन लागतात. पूर्ण जिल्हाभरातचा विचार केल्यास एक ते दीड कोटीपर्यंत या इंजेक्शनचा खर्च जातो. जीएमसीत शक्यतोवर जळगाव शहरात कुत्र्याने चावा घेतलेल्या जखमींवर उपचार होत असताता बाकी हे इंजेक्शन सर्व आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहेत.