जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 20:51 IST2025-10-28T20:50:09+5:302025-10-28T20:51:02+5:30
ST Bus Accident: पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ हा अपघात घडला. नाशिक येथून जळगावकडे येणाऱ्या एसटी बसला अपघात घडला.

जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरापासून काही अंतरावर एसटी बसला भीषण अपघात घडलाय. यात अपघातात एसटी बस चालकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पारोळा तालुक्यातील विचखेडा गावाजवळ हा अपघात घडला. नाशिक येथून जळगावकडे येणाऱ्या एसटी बसला (क्रमांक MH 20 2579) हा अपघात घडला. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पारोळा तालुक्यात सायंकाळी पाऊस सुरू होता.
पावसामुळे एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात एसटी बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, मंगळवारी दुपारी जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोलनाक्याजवळ एसटी बसच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दुपारी ही घटना घडल्यानंतर सायंकाळी पुन्हा एसटी बसला अपघात झाल्याची घटना घडली.