रामेश्वर कॉलनीत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:17 IST2020-08-31T11:16:25+5:302020-08-31T11:17:00+5:30

कारण अस्पष्ट : घरमालकाच्या रिकाम्या खोलीत घेतला गळफास

Suicide of a 10th standard student in Rameshwar Colony | रामेश्वर कॉलनीत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

रामेश्वर कॉलनीत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

जळगाव : रामेश्वर कॉलनीत योगिता लिलाधर जयकर (१५, रा.स्वामी समर्थ मंदिराजवळ) या मुलीने घराशेजारील रिकाम्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. दरम्यान, योगिता हिने आत्महत्या का? केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. योगिता ही यंदा दहावीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री योगिता हिने कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर सर्व जण झोपले, पहाटेच्या सुमारास उठून ती घराशेजारीच घरमालकाच्या एका रिकाम्या खोलीत गेली व तेथे तिने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ७.३० कुटुंब झोपेतून उठले असता योगिता घरात नव्हती. शेजारी जावून पाहिले असता शेजारच्या खोलीत ती गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसली.

आईने फोडला हंबरडा
योगिताने गळफास घेतल्याचे दिसताच आईने हंबरडा फोडला. त्यामुळे कुटुंब धावून आले. त्यांनी भाऊ व इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांनी योगिता हिला खाली उतरवून रिक्षातून दोन रुग्णालयांमध्ये नेले. तत्पूर्वी तिचा मृत्यू झालेला होता. योगिता हीच्या वडीलांचे निधन झालेले आहे. ती आई, बहिण व भाऊ यांच्यासोबत राहत होती. रामेश्वर कॉलनीतील विद्यालयात ती शिक्षण घेत होती. उपनिरीक्षक संदीप पाटील व कॉ.विश्वजित सोनवणे यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. घटनास्थळी चिठ्ठी वगैरे काहीच नव्हते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

Web Title: Suicide of a 10th standard student in Rameshwar Colony